अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाल्याने प्रतिमा मलिन झाली असली तरी नियोजित तारखेलाच अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडण्याच्या भूमिकेवर फिफा ठाम आहे. फि फाचे प्रसिद्धीप्रमुख वॉल्टर डी ग्रेगोरिओ यांनी ही कारवाई फिफामधील भ्रष्टाचार दूर करण्यास मदतशीर असल्याचे सांगितले. या कारवाईमुळे ब्लाटर हे निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात असल्याच्या वृत्ताचे ग्रेगोरिओंनी खंडन केले. ते म्हणाले की, ‘‘गत वर्षी १८ नोव्हेंबरला फि फाने भ्रष्टाचाराविरुद्धच्या कारवाईसाठी पुढाकार घेतला होता. तसेच आम्ही २०१८ आणि २०२२ च्या विश्वचषक लिलाव प्रक्रिये संदर्भात कायदेशीर तक्रार केली होती. बुधवारी झालेल्या कारवाईचे फिफाकडून स्वागत आणि या संबंधित सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आम्ही देऊ इच्छितो.’’   ‘‘ या प्रकरणात सहसचिव आणि अध्यक्षांचा सहभाग नाही. या कारवाईमुळे फिफा बैठक किंवा निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही आमच्या अजेंडय़ानुसार निवडणूक ठरलेल्या दिवशी घेणार आहोत.’’, असे ग्रेगोरिओंनी स्पष्ट केले. मात्र, या कारवाईमुळे फिफामधील भ्रष्टाचार दूर होईल असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘‘ही कारवाई फिफाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी आहे, परंतु संघटनेतील मलिनता नाहीशी होण्याची दृष्टीने ती महत्त्वाची आहे.’’