१७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचा इटलीवरील विजय फसवा

भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाने शुक्रवारी इटलीच्या संघावर २-० असा विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली, असा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) जाहीर केलेल्या प्रत्येक निवेदनातून केला जात आहे. हा विजय भारतीय फुटबॉल क्षेत्राचा नवा अध्याय असल्याची कौतुकाची थापही एआयएफएफ आपल्या पाठीवर मारून घेत आहे. मात्र या विजयामागचे सत्य वेगळेच आहे. भारत ज्या संघाविरुद्ध खेळला तो इटलीचा राष्ट्रीय संघ नसून तेथील तिसऱ्या व चौथ्या विभागीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश असलेला संघ होता. त्यामुळे एआयएफएफकडून करण्यात आलेली ऐतिहासिक विजयाची ‘बनवाबनवी’ उघड झाली आहे.

इटलीचा १७ वर्षांखालील राष्ट्रीय संघ ९ मे रोजी अखेरचा सामना खेळला. युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेतील (१७ वर्षांखालील) या लढतीत टर्कीने २-१ असा विजय मिळवला. तसेच भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची पात्रता मिळवण्यातही इटलीला अपयश आले आहे. भारताविरुद्ध खेळणाऱ्या त्या संघात एकाही राष्ट्रीय संघातील खेळाडूचा समावेश नव्हता. तेथील तिसऱ्या व चौथ्या विभागीय स्पर्धेतील (त्यांना अनुक्रमे लेगा प्रो व लेगा प्रो २ असे संबोधले जाते) खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाविरुद्ध भारताने हा विजय मिळवला आहे. यापैकी एकाही खेळाडूने युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेत इटलीचे प्रतिनिधित्व केलेले नव्हते. तरीही या विजयाने फुटबॉल क्षेत्रात गोंधळाचे वातावरण निर्माण केले.

माजी फुटबॉलपटू, क्रिकेटपटू, सिने अभिनेते, महासंघाचे अधिकारी, क्रीडा मंत्रालय आणि आशियाई फुटबॉल महासंघ या ‘ऐतिहासिक’ विजयाच्या जल्लोषात मश्गूल झाले. सर्वानी प्रशिक्षक लुइस नॉर्टन डे मॅटोस आणि त्यांच्या संघाचे भरभरून कौतुकही केले, परंतु या सामन्याचा निकाल इटालियन फुटबॉल महासंघाच्या अधिकृत संकेतस्थळावर शोधूनही सापडला नाही. त्याबाबतची माहिती (खेळाडूंच्या नावांसह) लेगा प्रोच्या संकेतस्थळावर सापडली. त्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तो संघ ‘राष्ट्रीय लेगा प्रो’चा प्रतिनिधित्व करणारा असल्याचे नमूद केले

होते. त्यामध्ये मोडेना, पॅर्मा, अब्लिनोलेफ, पॅडुआ आणि कॅरारा या क्लबमधील खेळाडूंचा समावेश होता आणि त्यांना डॅनिएल अ‍ॅरिगोनी हे मार्गदर्शन करीत होते. एमिलियानो बिगिसा हे इटलीच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आहेत.

भारतात होणाऱ्या फुटबॉल (१७ वर्षांखालील) विश्वचषक स्पध्रेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघ परदेश दौऱ्यावर गेला आहे. आतापर्यंत या दौऱ्यातील ७ सामन्यांत पाचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले. या निराशाजनक कामगिरीकडून लक्ष हटविण्यासाठी एआयएफएफकडून हा फसवा दावा करण्यात येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.