१७ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेच्या संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. पहिल्या सामन्यात भारतावर ३-० ने मात केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात घानावरही अमेरिकेने विजय मिळवला आहे. १-० च्या फरकाने सामना जिंकत अमेरिकेने पुढच्या फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. बदली खेळाडू अयो अकिनोलाने ७५ व्या मिनीटाला अमेरिकेसाठी एकमेव गोल झळकावला. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.

अवश्य वाचा – U-17 World Cup Football – दोन महिन्यांपूर्वी काय घडलं होतं भारत विरुद्ध कोलंबिया सामन्यात?

घानाच्या संघाने याआधी दोन वेळा विश्वचषकाची स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे अमेरिकेसाठी हा सामना सोपा जाणार नाही याची सर्वांना खात्री होती. मात्र, अमेरिकेच्या प्रशिक्षकांनी ६३ व्या मिनिटाला अकिनोला संघात जागा दिली, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत अकिनोलाने आपल्या संघासाठी गोल झळकावला. घानाच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण करत अमेरिकेच्या गोलपोस्टवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकन बचावफळीच्या खेळापुढे त्यांचा निभाव लागला नाही.

दुसऱ्या सत्राच्या तुलनेत पहिल्या सत्रात दोन्ही संघानी बचावात्मक पवित्रा घेतलेला पहायला मिळाला. अमेरिकेच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात गोल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, घानाच्या गोलरक्षकाने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. संपूर्ण सामन्यात अमेरिकेच्या तुलनेत घानाच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र, त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आलं.