डॅनियल लोडर विजयाचा शिल्पकार

सर्वात आव्हानात्मक गट म्हटल्या जाणाऱ्या फ गटातून इंग्लंड आणि इराकने आपले स्थान आधीच नक्की केले होते. त्यामुळे या सामन्याच्या निकालापेक्षा या दोन संघांमधील रंगत क्रीडारसिकांना अनुभवायची होती. मात्र प्रत्यक्षात इंग्लंडपुढे इराकचा संघ निष्प्रभ ठरला. डॅनियल लोडर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

इंग्लंडने फ-गटात सलग तिसरा सामना जिंकून ९ गुणांसह बाद फेरी गाठली असून त्यांचा जपानशी सामना होणार आहे. इंग्लंडच्या अँजेल गोम्सने ११ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले; परंतु इराकने पहिल्या सत्रात उत्तम लढत देत त्यांना मोठी आघाडी घेऊ दिली नाही.

दुसऱ्या सत्रात इंग्लंडने तीन गोल नोंदवले. ५७ व्या मिनिटाला इमाइल स्मिथ रोवेने संघाचा दुसरा गोल झळकावला. मग लोडरचा नेत्रदीपक खेळ पाहायची संधी कोलकातावासीयांना मिळाली. त्याने अनुक्रमे ५९ व्या आणि ७१ व्या मिनिटाला असे दोन गोल झळकावले.

इंग्लंड

अँजेल गोम्स ११’

इमाइल स्मिथ रोवे ५७’

डॅनियल लोडर ५९’, ७१’

इराक

करिम केसगिन ९०’+३

 

फ्रान्सच्या विजयात फ्लिप्स चमकला

होंडुरासवर ५-१ असा शानदार विजय; उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनशी गाठ

 गुवाहाटी  : युरोपियन महासत्ता म्हणून बिरुद मिरवणाऱ्या फ्रान्सने अ‍ॅलेक्सिस फ्लिप्सच्या दोन गोलच्या बळावर होंडुरासचा ५-१ असा पराभव केला आणि गटविजेत्याच्या थाटात कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.

या सामन्याआधीच फ्रान्सने इ-गटातून आपले स्थान निश्चित केले होते. परंतु आता साखळीतील सर्व सामने जिंकून ९ गुणांसह त्यांनी बाद फेरी गाठली आहे. उपउपांत्यपूर्व फेरीसाठी त्यांना गुवाहाटी येथेच १७ ऑक्टोबरला युरोपियन पात्रता स्पर्धेतील विजेत्या स्पेनशी सामना करावा लागणार आहे. या पराभवानंतरही होंडुरासचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे.

फ्रान्सने या सामन्यावर वर्चस्व राखताना ६६ टक्के चेंडूवर ताबा ठेवला. याचप्रमाणे गोललक्ष्याचा प्रयत्न १० वेळा केला, त्या तुलनेत होंडुरासला ही संधी फक्त तीनदाच मिळाली.

होंडुरासच्या कार्लोस मेजियाने १०व्या मिनिटाला संघाला आश्चर्यकारक आघाडी मिळवून दिल्यामुळे फ्रान्सचे धाबे दणाणले होते. मात्र त्यानंतर फ्रान्सने होंडुरासला डोके वर काढण्याची अजिबात संधी दिली नाही. फ्रान्सने त्यानंतर पाच गोल केले, यापैकी तीन गोल दुसऱ्या सत्रात केले.

मात्र अ‍ॅलन केरॉडॅनने दिलेल्या पासवर विल्सन इसिडोरने १४ व्या मिनिटाला गोल साकारत फ्रान्सला बरोबरी साधून दिली.

फ्लिप्सने २३व्या मिनिटाला फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात फ्रान्सकडे २-१ अशी आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात फक्त फ्रान्सचे निर्विवाद वर्चस्व दिसून आले. फ्लिप्सने ६४ व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल नोंदवला. त्यानंतर ८६व्या मिनिटाला अ‍ॅमिने गॉयरीने चौथा गोल केला.

भरपाई वेळेतील सहाव्या मिनिटाला यासिन अ‍ॅडलीने फ्री किकद्वारे पाचवा गोल केला. फ्लिप्सला गोल करण्यापासून अडवण्याच्या प्रयत्नात होंडुरासच्या खेळाडूने चूक केली.

इ गट

फ्रान्स

विल्सन इसिडोर १४’

अ‍ॅलेक्सिस फ्लिप्स २३’, ६४’

अ‍ॅमिने गॉयरी ८६’

यासिन अ‍ॅडली ९०’+6

 

होंडुरास

कार्लोस मेजिया १०’

 

बरोबरीमुळे मेक्सिकोची आगेकूच; चिलीचे आव्हान संपुष्टात

पीटीआय, गुवाहाटी

गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्यामुळे मेक्सिको व चिली यांच्यातील अखेरचा साखळी सामना गोलशून्य बरोबरीत संपला. या बरोबरीमुळे मेक्सिकोने आगेकूच करणाऱ्या तिसऱ्या स्थानांवरील संघांच्या मार्गाने आगेकूच केली, तर चिलीचे कुमारांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमधील खेळाडूंनी अनेक वेळा गोल करण्यासाठी जोरदार चाली केल्या. परंतु त्यांचे प्रयत्न अचूकतेच्या अभावी असफल झाले. साखळी गटात मेक्सिकोने दोन गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्यांनी तीन सामन्यांपैकी दोन सामने बरोबरीत ठेवले तर एका लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चिली संघाला साखळी गटात शेवटचे स्थान मिळाले. त्यांना केवळ एक गुण मिळवता आला. त्यांनी तीन सामन्यांपैकी एक सामना बरोबरीत ठेवला तर दोन सामन्यांमध्ये त्यांना हार मानावी लागली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दांडगाईचा खेळ करीत प्रेक्षकांची निराशा केली.

 

फ गट

मेक्सिको

 

चिली

 

कॅलेडोनियाने बरोबरीत रोखूनही जपानचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

कोलकाता : आशिया खंडातील फुटबॉलची महासत्ता म्हणून ओळखल्या गेलेल्या जपानला न्यू कॅलेडोनियाने १-१ असे बरोबरीत रोखले. मात्र साखळीनंतर इ गटात दुसरे स्थान मिळवत जपानने कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत सातत्याने प्रभावी कामगिरी करणाऱ्या केटो नाकामुराने सातव्या मिनिटाला जपानचे खाते उघडले. या गोलच्या आधारे त्यांनी ८३ व्या मिनिटापर्यंत आघाडी टिकवली होती. मात्र ८३ व्या मिनिटाला कॅलेडोनियाचा कर्णधार जेकब जेनोने अप्रतिम गोल केला व जपानच्या विजयाच्या अपेक्षांना धक्का दिला. अर्थात हा सामना बरोबरीत राहिला तरीही होंडुरास संघाला फ्रान्सविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर जपानचा बाद फेरीचा प्रवेश सुकर झाला. जपानने साखळी गटातील तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला व एक सामना बरोबरीत ठेवला. त्यांना फ्रान्सकडून पराभूत व्हावे लागले होते.

बाद फेरी गाठण्यासाठी जपानला कॅलेडोनियाविरुद्धचा सामना किमान बरोबरीत ठेवावा लागणार होता. त्या दृष्टीने त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. सातव्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची हुकमी संधी मिळाली. त्याचा फायदा घेत नाकामुराने चेंडू गोलपोस्टमध्ये तटवला.

हा गोल झाल्यानंतर दोन्ही संघांकडून जोरदार चाली झाल्या. मात्र गोल करण्याच्या अचूकतेअभावी बराच वेळ जपानकडेच १-० अशी आघाडी होती. पूर्वार्धातही हीच आघाडी त्यांनी ठेवली होती. उत्तरार्धातही त्यांनी खेळावर नियंत्रण राखले होते. कॅलेडोनिया संघाकडूनही सतत जोरदार चाली सुरू होत्या. अखेर ८३ व्या मिनिटाला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. जेकबने हेडरद्वारे हा गोल केला. हा गोल झाल्यानंतर जपानने आघाडी घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले; परंतु त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले.

 

इ गट

जपान

किटो नाकामुरा ७’

 

न्यू कॅलेडोनिया

जेकब जीनो ८३’