भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेला अवघ्या ५० दिवस शिल्लक राहिले आहेत. ६ ऑक्टोबरला नवी दिल्ली आणि नवी मुंबई येथे एकाच वेळी या स्पध्रेला सुरुवात होणार आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर कोलंबिया विरुद्ध घाना आणि नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियवर न्यूझीलंड विरुद्ध टर्की या लढतींनी सायंकाळी ५ वाजता स्पध्रेला सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली आणि नवी मुंबईसह गोवा, गुवाहाटी, कोलकाता आणि कोची येथे या स्पध्रेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. ‘‘ही स्पर्धा जवळ आली आहे आणि त्याबाबची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फुटबॉलचा ज्वरही वाढताना दिसत आहे आणि आशा करतो की हा ज्वर प्रत्यक्ष स्टेडियमवर प्रेक्षकांच्या मोठय़ा उपस्थितीतून पाहायला मिळेल,’’ असा विश्वास स्थानिक आयोजन समितीचे प्रमुख झेव्हियर सेप्पी यांनी व्यक्त केला.

  • सिंगापूर फुटबॉल असोसिएशनकडून १६ वर्षांखालील लायन सिटी चषक स्पध्रेचे आयोजन करण्यात येत होते. त्यातून प्रेरणा घेत फिफाने १६ वर्षांखालील फुटबॉल स्पध्रेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, १९९१ त्याचे रूपांतर १७ वर्षांखालील विश्वचषक स्पध्रेत करण्यात आले.
  • फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेसाठी इतर कॉन्फेडरेशन १७ वर्षांखालील पात्रता स्पध्रेचे आयोजन करतात, परंतु विश्वचषक स्पध्रेच्या पात्रतेसाठी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पध्रेचे आयोजन करणारा आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन हा एकमेव महासंघ आहे.
  • यजमान म्हणून फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकणारा मेक्सिको हा एकमेव देश आहे. त्यांनी २०११मध्ये उरुग्वेवर २-० असा विजय मिळवून हा पराक्रम केला होता. मात्र, २०१३मध्ये त्यांना जेतेपद कायम राखण्यात अपयश आले. नायजेरियाने त्यांना पराभूत केले.
  • स्वित्र्झलड आणि सोव्हियत युनियन यांनी विश्वचषक स्पध्रेतील पदार्पणात जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला.
  • ब्राझील आणि नायजेरिया या दोन देशांना फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पध्रेचे जेतेपद कायम राखण्यात यश आले आहे.