निर्धारित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर ५-३ असा विजय

कोलकाताच्या चाहत्यांनी दिलेल्या भरभरुन प्रेमाची परतफेड करताना इंग्लंडने मंगळवारी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटच्या थरारक लढतीत इंग्लंडने ५-३ अशी बाजी मारली आणि कोलकातावासियांचा विजयानिशी निरोप घेतला. प्रेक्षकांनाही टाळ्यांच्या जल्लोषात इंग्लंडच्या खेळाडूंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिला. इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना गोवा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर होणार असून त्यांच्यासमोर अमेरिकेचे आव्हान आहे.

इंग्लंड आणि जपान यांच्यातील लढतीच्या निकालाचा अंदाज बांधणे सुरुवातीपासून अवघड होते. दोन्ही संघांची या स्पध्रेतील कामगिरी उल्लेखनीय झाली होती. मात्र, इंग्लंडने अपराजित राहण्याची मालिका कायम राखली होती. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरच इंग्लंडचे साखळी सामने झाले होते आणि प्रेक्षकांनीही त्यांना भरभरुन प्रेम दिले होते. प्रेक्षकरुपी या बाराव्या खेळाडूने प्रत्येक पावलावर इंग्लंडच्या संघाला पाठींबा दिला. त्यामुळेच जपानविरुद्धच्या लढतीत निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयशी ठरुनही त्यांचे मनोबल खचले नाही. मात्र, जपानच्या लढाऊ वृत्तीचे विशेष कौतुक करायला हवे. त्यांनी चिकाटीने इंग्लंडचे आक्रमण थोपवले. सर्वाधिक (६२%) काळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवूनही इंग्लंडला गोल करण्यात आलेले अपयश हे जपानच्या चिकाटीची प्रतिची घडवते. पेनल्टी शुटआऊटमधील एक चुक सोडल्यास त्यांनीही इंग्लंडच्या तोडीसतोड खेळ केला. ३८ टक्के काळ चेंडू ताब्यात असूनही जपानने ५ वेळा गोलजाळीच्या दिशेने चेंडू टोलावला, परंतु इंग्लंडचा गोलरक्षक कर्टीस अँडरसनने हे सर्व प्रयत्न अपयशी ठरवले.

पेनल्टी शूटआऊटच्या थरारात पहिल्या दोन प्रयत्नांत उभय संघाच्या खेळाडूंना गोल करण्यात यश आले. जपानच्या युकिनारी सुगावारा व तैसेई मियाशिरो यांनी, तर इंग्लंडच्या कॅलम हडसन-ओडोई व ऱ्हीयान ब्रेवस्टर यांनी हे गोल केले. फिलीप फोडेनने इंग्लंडला ३-२ अशा आघाडीवर आणले आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी देणारा क्षण आला. हिनाटा किडाचा गोल करण्याचा प्रयत्न  गोलरक्षक अँडरसनने रोखला आणि जपानच्या संघात तणाव निर्माण झाला.

त्या पुढच्या प्रयत्नात अँडरसनने गोल केला आणि इंग्लंडला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानच्या सोईचिरो कोझुकीने गोल केला, परंतु पराभवाचे शल्य त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. निया किर्बीने अखेरचा गोल करून इंग्लंडच्या विजयावर ५-३ अशी शिक्कामोर्तब केले.