गोव्यातील लोकांना काजूच्या वेगवेगळय़ा पदार्थाचे जसे आकर्षण असते, तितकेच हे लोक फुटबॉलवर मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावरील आंतरक्लब स्पर्धामध्ये गोव्याचे चार संघ सतत चर्चेत असतात. या ठिकाणीही कुमार विश्वचषक स्पर्धेबाबत कमालीचे औत्सुक्य आहे. या स्पर्धेतील काही सामने फाटरेडा स्टेडियमवर होणार आहेत.  आकारमानाने गोवा हे छोटे राज्य असले तरी चर्चिल ब्रदर्स, साळगांवकर स्पोर्ट्स क्लब, गोवा स्पोर्टिग क्लब, डेम्पो क्लब या चार संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडविले आहेत. या स्टेडियमवर क्रिकेटचे काही आंतरराष्ट्रीय सामने झाले असले तरीही फुटबॉल हा येथील लोकांचा श्वास आहे. जेव्हा विश्वचषक स्पर्धेचे संयोजनपद भारताला मिळाले, तेव्हा या स्पर्धेतील काही सामने येथे होणार ही काळय़ा दगडावरची रेघ होती. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता जेमतेम २० हजार असली तरीही येथे येणाऱ्या फुटबॉलचाहत्यांना येथील रमणीय निसर्गसौंदर्याचाही आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वातानुकूलित आरामव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्ड्स, पत्रकार परिषदांकरिता विशेष कक्ष, समालोचन व थेट प्रक्षेपणाकरिता विशेष खोल्या, खेळाडूंसाठी आधुनिक सुविधांनीयुक्त व्यायामशाळा, प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यांसाठी व्यासपीठे आदी अनेक सुविधा तेथे निर्माण करण्यात आल्या आहेत. या स्टेडियममध्ये उत्तेजक प्रतिबंधक चाचणीचीही सुविधा करण्यात आली आहे. खेळाडू व प्रेक्षकांसाठीही वैद्यकीय मदत केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. पूर्णपणे आच्छादित गॅलरी व आरामदायक आसन व्यवस्था यामुळे प्रेक्षकांना येथे मनमोकळपणाने सामने पाहता येतात.