यजमान म्हणून फिफा कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळाली, परंतु जागतिक दर्जाच्या पहिल्याच स्पर्धेत भारतासमोर साखळी फेरीतच कडवे आव्हान आहे. अनेक विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या अमेरिका (१५), घाना (५) आणि कोलंबिया (८) यांच्यासारख्या मातबर संघांशी भारताला दोन हात करावे लागणार आहेत. त्यात घानाने दोन वेळा हा चषक उंचावला आहे. या गटात त्यांनाच प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यादृष्टीने भारतीय खेळाडूंनी तीन महिन्यांत अधिक मेहनत घेऊन सराव केला आहे. मणिपूरचा मध्यरक्षक अमरजीत सिंग कियामकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे आणि संपूर्ण संघाला तो कशा प्रकारे घेऊन जाईल याकडे नजरा खिळल्या आहेत. अनिकेत जाधवकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

गट अ

  • भारत : भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) स्पर्धेत सहभाग घेणार आहे, तर ५७ वर्षांनंतर ते जागतिक स्पर्धेत खेळणार आहेत. १९४८, १९५२, १९५६ आणि १९६० मध्ये भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाने ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. सारंगपनी रमण (१९४८ लंडन ऑलिम्पिक) यांच्या नावावर भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम आहे.
  • कोलंबिया : भारतात दाखल होणारा हा पहिलाच संघ. आठ वर्षांनंतर कोलंबियाचा संघ या विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. नायजेरिया येथे २००९ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी शेवटचा सहभाग नोंदवला होता. २००३च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी फिनलॅण्डवर मिळवलेला ९-१ असा विजय हा या स्पर्धेतील दुसरा मोठा विजय आहे. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या चार खेळाडूंमध्ये कोलंबियाच्या कार्लोस हिडाल्गोचा समावेश आहे.
  • अमेरिका : ब्राझीलसह फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक १६ वेळा सहभाग घेण्याचा विक्रम अमेरिकेच्या नावावर नोंदवला जाणार आहे. २०१३ वगळता त्यांनी सलग १४ वेळा या स्पर्धेत प्रतिनिधित्व केले असून १९९९ मध्ये त्यांनी चौथे स्थान पटकावले होते. ती त्यांची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पण या स्पर्धेत सर्वाधिक २८ पराभवांचा आणि सर्वाधिक ९६ गोल स्वीकारण्याचा नकोसा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
  • घाना : दोन वेळा जेतेपद पटकावणारा घाना संघ इतर संघाच्या तुलनेत वरचढ आहे. संभाव्य विजेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र जवळपास १० वर्षांनी त्यांचे या स्पर्धेत पुनरागमन होत आहे. पश्चिम अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांपैकी सलग चार विश्वचषक (१९९१ ते १९९७) स्पर्धाच्या अंतिम फेरीत खेळणारा तो एकमेव संघ आहे. त्यांनी १९९१ आणि १९९५ मध्ये जेतेपद पटकावले आहे.

कात टाकलेले नेहरू स्टेडियम

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची स्पर्धा होत असल्यामुळे त्या स्पर्धेला साजेसे स्टेडियम पाहिजे म्हणून नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. भारताचे सर्व साखळी सामने या स्टेडियमवर आयोजित होणार असल्यामुळेही त्याचे महत्त्व वाढले आहे. या नेहरू स्टेडियमवर १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १९८९ मध्ये तिथे आशियाई मैदानी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याकरिता या स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्या वेळी घाईघाईने या स्टेडियमचे बांधकाम करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात खेळाडू, संघटक व प्रेक्षकांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती यंदा घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. २०१४ पासून दिल्ली डायनामोज फुटबॉल क्लबचे हे घरचे मैदान झाले आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वातानुकूलित कक्ष व आरामव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक गुणफलक, पत्रकार परिषदांकरिता विशेष कक्ष, समालोचन व थेट प्रक्षेपणाकरिता विशेष खोल्या, खेळाडूंसाठी आधुनिक सुविधांयुक्त व्यायामशाळा, प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यांसाठी व्यासपीठे आदी अनेक सुविधा तेथे निर्माण करण्यात आल्या आहेत. या स्टेडियमचे आच्छादनही लंडन येथील ऑलिम्पिक स्टेडियमसारखे असल्यामुळे प्रेक्षकांना निधरेकपणे विविध स्पर्धाचा आनंद घेता येईल.

संकलन : स्वदेश घाणेकर