चिली येथे झालेल्या मागील विश्वचषक स्पध्रेत अनपेक्षित निकालांचा सपाटा लावताना मालीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांचा हा अश्वमेध नायजेरियाने रोखून जेतेपदाचा चषक उंचावला. भारतात होणाऱ्या कुमारांच्या विश्वचषक स्पध्रेत नायजेरियाच्या अनुपस्थितीत गतउपविजेत्या माली संघाचे पारडे जड मानले जात आहे. ‘ब’ गटात मालीला तुलनेने कमकुवत असलेल्या पॅराग्वे, न्यूझीलंड आणि टर्की यांचा सामना करावा लागणार आहे. मात्र प्रतिस्पर्धी संघांपैकी पॅराग्वे आणि टर्की हे गतउपविजेत्यांसमोर कडवे आव्हान उभे करण्याची क्षमता राखतात. पॅराग्वेने १९९९मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, तर २००९साली उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या टर्कीने २००५मध्ये चौथे स्थान पटकावले होते. विश्वचषक स्पध्रेत आतापर्यंत सात वेळा सहभागी झालेल्या न्यूझीलंडला केवळ तीन वेळाच बाद फेरीत प्रवेश करण्यात यश आले आहे.

माली

माली संघाने १९९७ ते २००१ या सलग तीन विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली होती. मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांना २००१नंतर विश्वचषक स्पध्रेत प्रवेश करण्यासाठी १४ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. प्रदीर्घ कालावधीनंतर विश्वचषक स्पध्रेत पुनरागमन करताना त्यांनी उपविजेतेपदापर्यंत मजल मारून सर्वाना आश्चर्यचकित केले. भारतात होणाऱ्या स्पध्रेतही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. सीएएफ १७ वर्षांखालील आफ्रिका चषक राष्ट्रीय स्पध्रेचे सलग जेतेपद पटकावणारा माली हा एकमेव संघ आहे. या स्पध्रेच्या उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटच्या थरारात मालीचा गोलरक्षक युसूफ कोइटाने प्रतिस्पर्धी गिनी संघाचा एकही प्रयत्न यशस्वी होऊ दिला नव्हता. त्यामुळे विश्वचषक स्पध्रेत कोइटाकडून त्यांच्या अपेक्षा नक्की उंचावल्या आहेत. विश्वचषक स्पध्रेच्या १८ सामन्यांत मालीने केवळ २४ गोल केले. ०.६१ या सरासरीने गोल त्यांच्या नावावर आहेत आणि ही स्पध्रेतील नीचांकी गोल सरासरी आहे.

न्यूझीलंड

सलग सहाव्यांदा न्यूझीलंड विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत आहे आणि त्यांनी एकूण आठ वेळा या स्पध्रेत सहभाग घेतला आहे. २००९, २०११ आणि २०१५मध्ये त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. १९९७मये इजिप्त येथे झालेल्या विश्वचषक स्पध्रेतून त्यांनी फिफाच्या स्पध्रेत पदार्पण केले. त्यानंतर पुढील विश्वचषक स्पध्रेचे यजामनपद त्यांनी भूषवले. न्यूझीलंडने सलग सहा वेळा ओशियाना फुटबॉल कॉन्फडरेशन (१७ वर्षांखालील) स्पध्रेचे जेतेपद पटकावले आहे. २०१७च्या स्पध्रेतील त्यांचे आव्हान जवळपास उपांत्य फेरीतच संपुष्टात आले असते, परंतु भरपाई वेळेतील एका गोलने त्यांनी पापुआ न्यू गिनीयावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या प्रवेशाबरोबर त्यांनी भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेतील पात्रताही निश्चित केली आणि हा आनंद त्यांनी अंतिम फेरीत न्यू कॅलेडोनियाला ७-० असे नमवून दणक्यात साजरा केला. न्यूझीलंडने विश्वचषक पात्रता स्पध्रेतील पाच सामन्यांत २७ गोल केले आणि केवळ दोन वेळाच त्यांना एका गोलच्या फरकाने विजयावर समाधान मानावे लागले.

टर्की

केवळ दोनच कुमार विश्वचषक स्पध्रेत खेळण्याचा अनुभव टर्कीच्या गाठीशी आहे. २००५च्या पहिल्याच विश्वचषक स्पध्रेत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यांना ब्राझिलकडून ३-४ असा निसटता पराभव पत्करावा लागला होता. तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत नेदरलँड्सने त्यांच्यावर २-१ असा विजय मिळवला. २००९मध्ये त्यांना उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असे नमवले. त्यानंतर आठ वर्षांनंतर टर्की विश्वचषक स्पध्रेत पुनरागमन करत आहे. यूएएफ युरोपियन १७ वर्षांखालील अजिंक्यपद स्पध्रेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून विश्वचषक पात्रता निश्चित केली.

पॅराग्वे

पॅराग्वे चौथ्यांदा विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत असून १९९९मध्ये पदार्पणातच त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता आणि ती त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानंतर २००१ आणि २०१५मध्ये त्यांना साखळी फेरीचा अडथळाही पार करता आला नाही. दक्षिण अमेरिका १७ वर्षांखालील अजिंक्यपद स्पध्रेत तिसरे स्थान पटकावून त्यांनी विश्वचषक स्पर्धेतील सहभाग निश्चित केला.