फिफा U-17 विश्वचषकात भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाला अमेरिकेच्या संघाने ३-० अशी मात करत, भारतीय संघाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारतीय संघाचे प्रशिक्षक लुईस नोर्टन मोतोस यांनी संघाच्या कामगिरीवर आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – Live U 17 World Cup Football – पहिल्याच सामन्यात भारताच्या पदरी पराभव, अमेरिका ३-० ने विजयी

दुसऱ्या सत्रात अखेरच्या मिनीटांमध्ये अनवर अलीकडे भारताचा पहिला गोल झळकावण्याची चांगली संधी आली होती. मात्र या संधीचा फायदा उचलण्यात आमचा संघ कमी पडला, आणि अमेरिकेने ही संधी साधत तिसरा गोल झळकावला आणि आम्ही मागे पडलो. सामना संपल्यानंतर प्रशिक्षक लुईस भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलत होते. ज्या पद्धतीने भारतीय संघाने अमेरिकेसारख्या बलाढ्य संघाला लढत दिली त्याबद्दल मी आनंदी आहे. अमेरिका आणि आमच्या खेळात मोठी तफावत होती, या गोष्टीचा आम्हाला मोठा फटका बसला, लुईस पत्रकारांशी बोलत होते.

जर भारतीय संघाने मिळालेल्या संधीचा लाभ उचलत पहिला गोल झळकावला असता, तर अमेरिकेच्या संघावर याचा विपरीत परिणाम झाला असता. मात्र आमचे खेळाडू तो गोल करण्यात अपयशी ठरले. मात्र पहिल्या सामन्यात भारतीय संघ ज्या तडफेने खेळलाय, ते पाहता पुढच्या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचंही भारतीय प्रशिक्षकांनी नमूद केलं.

भारत विरुद्ध अमेरिका या सामन्याला नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर ४६ हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. प्रत्येक सामन्यात घरच्या प्रेक्षकांचा पाठींबा हा अत्यावश्यक असतो, त्यामुळे आगामी सामन्यांमध्येही भारतीय प्रेक्षक आपल्या संघाला पाठींबा देण्यासाठी मैदानात उतरतील अशी आशा प्रशिक्षक लुईस यांनी व्यक्त केली.