कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने मेक्सिकोवर ३-२ अशी मात करत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या विजयासह इंग्लंडने पुढच्या फेरीत आपला प्रवेश निश्चीत केला आहे. इंग्लंड आणि मेक्सिको या दोन्ही संघानी आजच्या सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत आणली. हा सामना पहायला आलेल्या ४० हजारहून अधिक लोकांसाठी हा खऱ्या अर्थाने पैसा वसूल सामना ठरला. सामन्याच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने आपलं वर्चस्व ठेवलं होतं. दुसऱ्या सत्रात मेक्सिकोने इंग्लंडला चांगली लढत दिली, मात्र सामन्यात बरोबरी साधण्याची किमया त्यांना काही केल्या साधता आली नाही.

सामना सुरु झाल्यानंतर जवळपास अर्धातास दोन्ही संघांना गोलपोस्टवरची कोंडी फोडता आली नव्हती. अखेर इंग्लंडच्या रिहान ब्रिस्टरने ३९ व्या मिनीटाला फ्रि-किकवर इंग्लंडसाठी गोल करत गोलपोस्टवरची कोंडी फोडली. यापाठोपाठ फिलीप फोडेन आणि जाडोन सँचो यांनी गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून देत मेक्सिकोला चांगलाच धक्का दिला. हा सामना एकतर्फी होतोय असं वाटत असतानाच मेक्सिकोने सामन्यात जोरदार पुनरागमन करत सामन्यात रंगत आणली. दिएगो लेनिझने ६५ आणि ७२ व्या मिनीटाला गोल झळकावत इंग्लंडची आघाडी कमी केली. मात्र सामन्यात बरोबरी साधण्याचे मेक्सिकोचे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.

अवश्य वाचा – FIFA U-17 World Cup – ….तर भारताचा बाद फेरीत प्रवेश निश्चित

सामनच्या मध्यांतराला इंग्लंडकडे आघाडी होती. मेक्सिकोने पहिल्या सत्रात सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडचा गोलकिपर कर्टिस अँडरसनने मेक्सिकोचं आक्रमण थोपवून धरलं. सामन्याच्या पहिल्या सत्रात मेक्सिकोच्या खेळाडूंनी काही क्षुल्लक चुकाही केल्या. मेक्सिकोचा कर्णधार कार्लोस रोबलेस आणि अन्य खेळाडूंनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने पुढच्या फेरीत प्रवेश निश्चीत केला असल्याने मेक्सिकोचा संघ कसा खेळ करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.