फिफाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. अमेरिकेच्या संघाने भारतावर ३-० अशी मात करत, सलामीच्या सामन्यात यजमान संघाला धक्का दिला. मात्र ज्या पद्धतीने भारतीय संघाने अमेरिकेच्या संघाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, त्याचं सर्व स्तरातून कौतुक झालं. त्यामुळे पहिल्या सामन्यात पराभव झाला असला, तरीही आगामी सामन्यात भारत नक्की विजय मिळवेल अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. आज ‘अ’ गटात भारताचा सामना कोलंबियाशी होणार आहे.

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर हा सामना रंगणार आहे. मात्र भारत विरुद्ध कोलंबिया सामन्यांचा इतिहास हा भारताच्या बाजूने नाही. याआधी मेक्सिकोत झालेल्या ४ निमंत्रीत देशांच्या स्पर्धेत भारत आणि कोलंबियाचा संघ समोरासमोर आला होता. या सामन्यात कोलंबियाने भारतावर ३-० अशी मात केली होती. याव्यतिरीक्त मेक्सिकोच्या संघानेही भारताचा ५-१ ने धुव्वा उडवला होता. भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी कोलंबियाला चांगली टक्कर देण्याचा निर्धार केलाय. मात्र मागील सामन्यांचा इतिहास पाहता हा सामना भारतासाठी नक्कीच सोपा जाणार नाही.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या सामन्यात कोलंबियाच्या संघाने पहिल्या सत्रात आठव्या मिनीटाला गोल करत आपल्या संघाचं खातं उघडलं होतं. यानंतर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कोलंबियाच्या संघाने प्रत्येक वेळी भारतीय संघाचे प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या सत्राच्या अखेरीस कोलंबियाचा संघ २-० ने आघाडीवर होता. अखेरच्या सत्रात एक गोल झळकावत कोलंबियाने भारताच्या पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरवलं होतं.

अवश्य वाचा – पहिला धडा, तर दुसरा लढा!

कोलंबियाचा संघ या स्पर्धेत तुल्यबळ मानला जातोय. मात्र पहिल्याच फेरीत कोलंबियाला घानाच्या संघाने पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून आपल्या जुन्या फॉर्मात परतण्याचा कोलंबियाच्या संघाचा मानस असणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ अवस्थेचा असणार आहे, त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कोलंबियाला हरवण्यात यशस्वी ठरतो का हे पहावं लागणार आहे.