गतउपविजेते ५-१ अशा विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

गतउपविजेत्या मालीने उपउपांत्यपूर्व फेरीतील लढतीत मंगळवारी कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत दुसऱ्यांदाच सहभाग घेणाऱ्या इराकचा ५-१ असा सहज धुव्वा उडवला. गोव्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मालीकडून लसाना एंडायेने दोन गोल केले. त्याला हॅडजी ड्रॅमे, फोडे कोनाटे व सेमे चमारा यांनी प्रत्येकी एक गोल करून उत्तम साथ दिली.

चपळ आणि चतुर खेळ करण्यात तरबेज असलेल्या मालीने सुरुवातीपासूनच इराकची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. २५व्या मिनटाला सलाम जिडूच्या पासवर ड्रॅमेने मालीचे खाते उघडले. पेनल्टी क्षेत्रावर कुरघोडी करत मालीने गोलसपाटा लावला. मालीच्या आक्रमणपटूंना रोखण्यात इराकचे बचावपटू सपशेल अपयशी ठरले. ३३व्या मिनिटाला त्यात एंडायेने भर घातली. डीजेमौसा ट्रॅओरेन उजव्या बाजूने दिलेला चेंडू एंडायेने इराकच्या गोलरक्षकाला चकवून सहज गोलजाळीत धाडला. त्यानंतर मध्यंतरापर्यंत मालीचे आक्रमण रोखून धरण्यात इराकला यश आले.

दुसऱ्या सत्रातही इराककडून चांगला खेळ झाला आणि जवळपास तीस मिनिटे त्यांनी मालीला गोलसंख्या वाढवू दिली नाही. भक्कम बचाव करताना इराकने अधूनमधून आक्रमणही सुरू ठेवले, परंतु त्यांना गोल करता आला नाही. ७३व्या मिनिटाला मालीने दुसऱ्या सत्रातील पहिला गोल नोंदवला. ड्रॅमेच्या पासवर कोनाटेने हा गोल केला. या वेळी इराकलाही गोल खाते उघडण्यात यश आले. ८५व्या मिनिटाला अली करीमने हा गोल केला. मात्र, दोन मिनिटांनी मालीने आणखी एक गोल केला. चमाराच्या या गोलने मालीची गोलसंख्या ४-१ अशी झाली. त्यात भरपाई वेळेत एंडायेने भर घालत ५-१ अशा दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.