विश्वचषक पात्रता स्पर्धेत गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे आव्हान

युद्धजन्य परिस्थिती आणि अंतर्गत कलहात अडकलेल्या सीरियाच्या फुटबॉल संघाला विश्वचषक पात्रता खुणावत आहे. अशा कठीण प्रसंगातून जात असलेल्या या देशातील संघ अविश्वसनीय कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. पात्रता स्पर्धेत त्यांच्यासमोर आशियाई विजेता ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे.

सीरियात सध्या युद्धाचे वातावरण असल्यामुळे त्यांच्या देशात होणारे सामने मलेशियात आयोजित केले जात आहेत. त्यांचा ऑस्ट्रेलियाबरोबरचा परतीचा सामना सिडनी येथे पुढील आठवडय़ात होणार आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये सीरियाने दक्षिण कोरिया व इराण या बलाढय़ संघांना बरोबरीत रोखले होते. तसेच त्यांनी चीन, उजबेकिस्तान व कतार यांच्यावर सनसनाटी विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे उद्या होणाऱ्या सामन्याबाबत सीरियाचे प्रशिक्षक अयमान अल हकीम हे आशावादी आहेत. ते म्हणाले,‘आतापर्यंत आमच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविणे सोपे नसले तरीही आम्ही त्यांच्यावर मात करण्यासाठी शेवटपर्यंत क्षमतेच्या शंभर टक्के कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करू. संघातील खेळाडूंवर कोणतेही दडपण नाही. विजय मिळविण्यासाठी हे खेळाडू उत्सुक झाले आहेत.’

अर्जेटिनापुढे आज पेरूचे आव्हान

मॉन्टेविदिओ : फुटबॉलच्या जागतिक स्तरावर अर्जेटिनाचा दबदबा असला, तरी पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्यांच्यावर बाद होण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच ब्युनोस आयर्स येथे गुरुवारी होणाऱ्या पात्रता सामन्यात पेरूविरुद्ध त्यांची कसोटीच ठरणार आहे.

अर्जेटिनाची सध्याची कामगिरी पाहता त्यांनी दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली असेल असे कोणाला सांगूनही पटणार नाही. महागडय़ा खेळाडूंमध्ये गणना असलेल्या लिओनेल मेस्सी याचा समावेश असूनही अर्जेटिनाला पात्रता फेरीतील सोळा सामन्यांमध्ये केवळ सोळा गोल नोंदवता आले आहेत. स्पर्धेतून यापूर्वीच बाद झालेल्या बोलिव्हियानेही त्यांच्यापेक्षा जास्त गोल केले आहेत. व्हेनेझुएलाविरुद्ध नुकत्याच झालेल्या पात्रता फेरीच्या लढतीत त्यांना १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली होती. साखळी गटात अर्जेटिना पाचव्या स्थानावर असून पेरू देशानंतर त्यांचा फक्त इक्वेडोरविरुद्धचा सामना बाकी आहे. पहिले चार संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत

स्लोवेनियाविरुद्ध आज इंग्लंडची परीक्षा

लंडन : भरवशाचा आक्रमक खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या हॅरी केन हा कशी कामगिरी करतो यावरच इंग्लंडचे स्लोवेनियाविरुद्धच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पात्रता लढतीमधील यशापयश अवलंबून आहे. या दोन संघांमध्ये येथे गुरुवारी होणाऱ्या पात्रता फेरीत इंग्लंडची परीक्षाच आहे. हॅरीला ऑगस्टमध्ये गोलांच्या दुष्काळास सामोरे जावे लागले होते, मात्र सप्टेंबर महिन्यात त्याला सूर गवसला आहे. त्याने क्लब व देशाकडून आठ सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यामध्ये त्याने तेरा गोल केले आहेत. स्लोवेनियाविरुद्ध त्याच्यावरच इंग्लंडची मुख्य मदार आहे. हा सामना जिंकला, तर इंग्लंडला पुढील वर्षी रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील मुख्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.