टीम वीहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर अमेरिका उपांत्यपूर्व फेरीत

अमेरिकेने कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत पॅराग्वेची विजयी मालिका खंडित करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टीम वीहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर अमेरिकेने सोमवारी झालेल्या या लढतीत ५-० असा दणदणीत विजय मिळवला. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या वातावरणाशी समरस झालेल्या अमेरिकेने या लढतीत एकहाती वर्चस्व गाजवले. अँड्रय़ू कार्लटन व कर्णधार जोश सरजट यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात हातभार लावला.

नवी दिल्लीत साखळी फेरीच्या दोन लढती खेळण्याचा फायदा अमेरिकेला झाला. येथील वातावरणाशी अमेरिकेच्या खेळाडूंनी चांगलेच जुळवून घेतले होते व भारताचे आव्हान संपुष्टात आल्याने येथील प्रेक्षकांचाही अमेरिकेला पाठिंबा मिळाला. सुरुवातीला थोडासा संयमी वाटणाऱ्या या सामन्यात हळूहळू रंग भरू लागला. १९व्या मिनिटाला अ‍ॅकिनोलाने डाव्या बाजूने दिलेल्या पासवर वीहने अमेरिकेचे खाते उघडले.पुढील ७० मिनिटांत सामन्याचे पारडे अमेरिकेच्याच बाजूने झुकले होते. पहिल्या सत्रातील १-० अशा आघाडीनंतर अमेरिकेने मध्यंतरानंतर आक्रमणाची धार अधिक तीव्र केली. ५३व्या मिनिटाला व्हॅसिलेव्हच्या पासवर वीहने अमेरिकेची आघाडी २-० अशी वाढवली. त्यापाठोपाठ कार्लटनने गोल करताना अमेरिकेची गोलसंख्या तीन केली.

अखेरच्या दहा मिनिटांचा वेळ वगळता संपूर्ण लढतीत आक्रमक खेळ पाहायला मिळाला. सरजटने (७४ मि.) गोल करत अमेरिकेची आघाडी ४-० अशी मजबूत केली. त्यात अवघ्या तीन मिनिटांत वीहने हॅट्ट्रिकची नोंद करताना अमेरिकेच्या विजयावर ५-० असे शिक्कामोर्तब केले.