गट

वरिष्ठ गटात विश्वविजेतेपदाला गवसणी घालवणाऱ्या जर्मनीला कुमार गटात एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. ‘क’ गटातील संघांपैकी जर्मनीला जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. मात्र या गटातील इराण, कोस्टा रिका आणि गिनी यांनाही अजूनपर्यंत एकदाही कुमारांचा विश्वचषक उंचावता आलेला नाही. जर्मनी १९८५ मध्ये जेतेपदासमीप पोहोचले होते, परंतु अंतिम लढतीत नायजेरियाने त्यांना २-० असे नमवले. त्याच स्पर्धेतील चौथ्या स्थानावरील मजल ही गिनीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे या गटातील चारही संघांना पहिल्या जेतेपदाची आस लागली आहे.

इराण

कुमार विश्वचषक स्पध्रेच्या पहिल्या आठ स्पर्धामध्ये इराणला स्थान मिळवण्यात अपयश आले होते. २००१ मध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला. मात्र त्यांना साखळीच्या तिन्ही लढतीत हार पत्करावी लागली. आठ वर्षांनंतर त्यांनी विश्वचषक स्पध्रेत पुनरागमन करताना कामगिरीतील प्रगतीचा आलेख चढा राखला. २००९ आणि २०१३ च्या स्पर्धामध्ये त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. आशियाई खंडातून २०१७ च्या विश्वचषक स्पध्रेसाठी पात्र ठरणारा इराण हा पहिला देश आहे. त्यांनी एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धा जिंकून विश्वचषक स्पध्रेतील स्थान निश्चित केले. या स्पध्रेत इराणने एकूण १३ गोल केले. अली रझा असादबादी, अल्लाहयार सय्यद, मोहम्मद शरिफी आणि मोहम्मद घदेरी यांच्या नावावर प्रत्येक तीन गोल आहेत. अमीर खोडामोरादीने एक गोल केला.

गिनी

पहिल्या विश्वचषक स्पध्रेत (१९८५) सहभागी झालेल्या सहा संघामध्ये गिनीसह ब्राझील, जर्मनी, मेक्सिको, अमेरिका आणि कोस्टा रिका यांचा समावेश आहे. पदार्पणाच्या स्पध्रेत गिनीने चौथे स्थान पटकावले होते आणि ती त्यांची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. कुमार विश्वचषक स्पध्रेच्या इतिहासात पेनल्टी शूटआऊटवर विजय मिळवणारा गिनी हा पहिलाच संघ आहे. त्यांनी ८५च्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. सीएएफ (आफ्रिका महासंघ) कुमार आफ्रिका चषक स्पध्रेत तिसरे स्थान पटकावून गिनीने विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली. या स्पध्रेत सहा गोल करणाऱ्या गिनीच्या डीजीब्रिल फॅनडजेला गोल्डन बूट पुरस्काराने गौरवण्यात आले.

जर्मनी

जर्मनीचा संघ दहाव्यांदा कुमार विश्वचषक स्पध्रेत सहभागी होत आहे. युरोपियन देशांमधून विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक सहभाग घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहेत. तसेच त्यांनी चार वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि युरोपियन देशांतील हा विक्रमच आहे. १९८५मध्ये त्यांना उपविजेतेपद मिळाले होते. २००७ आणि २०११ मध्ये त्यांना तिसऱ्या, तर १९९७ मध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

कुमार विश्वचषक स्पध्रेत प्रतिनिधित्व केलेल्या चार खेळाडूंचा २०१४च्या विश्वविजेत्या जर्मनीच्या संघात सहभाग होता. त्यामध्ये रोमन वेइनेन्फेलर (१९९७), टोनी क्रूस (२००७), मारियो गोत्झे आणि श्कोड्रान मुस्ताफी (२००९) यांचा समावेश आहे.

जर्मनीला कुमार विश्वचषक स्पध्रेतील मागील १४ सामन्यांत एकदाही अनिर्णीत निकाल नोंदवता आलेला नाही. त्यांनी ९ सामन्यांत विजय, तर ४ पराभव स्वीकारले आहेत. २००९मध्ये कोलंबियाविरुद्ध त्यांनी अखेरची ३-३ अशी अनिर्णीत निकालाची नोंद केली होती. युरोपियन पात्रता फेरीत जर्मनीने पाच सामन्यांत १७ गोल्सचा पाऊस पाडला. त्यातील सर्वाधिक ७ गोल फिऐट अर्पने केले.

कोस्टा रिका

कुमार विश्वचषक स्पध्रेत दहाव्यांदा सहभागी होणाऱ्या आठ देशांमध्ये कोस्टा रिकाचा समावेश आहे. कोस्टा रिकाने चार वेळा विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. २००१ ते २००५ अशा सलग तीन स्पर्धामध्ये आणि २०१५ मध्येही त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला. मध्ये अमेरिका पात्रता स्पध्रेत यजमान कोस्टा रिकाने चारही सामने जिंकून १७ वर्षांखालील उपखंडीय स्पध्रेत प्रवेश केला. त्यांनी क्युबा, कॅनडा आणि सुरिनेम यांना पराभूत केला.