जर्मनीच्या कुमार फुटबॉल संघाचे रविवारी गोव्यात आगमन झाले, त्या वेळी कर्णधार जॅन-फिएट अ‍ॅर्पची उपस्थिती प्रकर्षांने जाणवत होती. ब्राझीलच्या व्हिनिशियस ज्युनियरप्रमाणे अ‍ॅर्पचीही भारतवारी चुकते की काय, अशी चर्चा सुरू झाली. मात्र सोमवारी अ‍ॅर्प गोव्यात दाखल झाला आणि त्याने खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभाग घेतला. अ‍ॅर्पच्या आगमनाने जर्मनीच्या संघातही उत्साहाचे वातावरण जाणवले.

हॅमबर्ग क्लबकडून खेळणाऱ्या अ‍ॅर्पने पदार्पणाच्याच लढतीत आपली चुणूक दाखवली. वेर्डेर ब्रेमेन क्लबविरुद्धचा तो सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. अ‍ॅर्प रविवारी रात्रीच गोव्यात दाखल झाला. प्रशिक्षक ख्रिस्टियन वुक यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीच्या संघाने कसून सराव केला. गोव्यातील निसर्गाच्या सान्निध्यात खेळाडू सराव करीत असलेले छायाचित्र त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे.

अ‍ॅर्पने मे महिन्यात झालेल्या युएफा युरोपियन १७ वर्षांखालील स्पध्रेत दोन हॅट्ट्रिक नोंदवल्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर जर्मनीचा संघ पहिल्यांदा कुमार विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. जर्मनीला ‘क’ गटात कोस्टारिका, इराण आणि गिनी यांचे आव्हान असणार आहे. ७ ऑक्टोबरला त्यांचा पहिला सामना कोस्टारिकाविरुद्ध होणार आहे.

वुक हे २०१२ पासून जर्मनीच्या १६ व १७ वर्षांखालील संघासोबत काम करीत आहेत. गोव्यात दाखल झाल्यापासून त्यांनी अधिक काळ न घेता खेळाडूंना सराव करायला लावला. ‘येथे आल्याचा आनंद आहे आणि कुमार विश्वचषक स्पध्रेत खेळण्यासाठी आम्ही आतुर आहोत. येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आमच्याकडे पाच दिवसांचा कालावधी आहे,’ असे वुक म्हणाले.