भारतीय शूर सरदारांचा कर्णधार अमरजीत सिंग याचे उद्गार

‘शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती?’ याच आवेशात निधडय़ा छातीचा संघनायक अमरजीत सिंग कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेला सामोरा जात आहे. भारताचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात अमेरिका, कोलंबिया आणि घानासारख्या आव्हानात्मक संघांचा समावेश असला तरी आम्हाला त्यांना सामोरे जाताना अजिबात भय वाटत नाही, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार अमरजीतने काढले आहेत.

‘‘नवे प्रशिक्षक लुइस नॉर्टन डी मॅटोस (पोर्तुगाल) यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच काही नव्या गोष्टी शिकलो आहोत. बलाढय़ संघांविरुद्ध आवश्यक असलेला मानसिक कणखरपणा परदेश दौऱ्यांवर आम्ही आत्मसात केला आहे,’’ असे अमरजीतने सांगितले. भारतीय संघ बुधवारी दुपारी नवी दिल्लीला प्रस्थान करणार आहे.

नवी दिल्ली येथील जवाहरलाल  नेहरू स्टेडियमवर भारतीय संघ ६ ऑक्टोबरला अमेरिकेशी, ९ ऑक्टोबरला कोलंबियाशी आणि १२ ऑक्टोबरला घानाशी सामना करणार आहे. याबाबत अमरजीत म्हणाला, ‘‘विश्वचषकात सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करून उत्तम सामने खेळणे, ही आमची योजना आहे. याकरिता आम्ही बरीच मेहनत करीत आहोत. या स्पध्रेत उत्तम सांघिक प्रतिमा राखण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’