‘कोंबडी आधी की अंडे आधी’ या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आणि गोंधळात टाकणारे. फुटबॉलमध्येही क्लब की देश, हा वाद असाच रंगतो. देशाप्रति खेळणे हे कधीही अभिमानास्पद असते. मात्र विश्वचषक आणि काही मोजक्या स्पर्धाचा अपवाद सोडला तर एरवी फुटबॉलपटू क्लबतर्फे खेळण्यातच व्यस्त असतात. क्लब हेच त्यांचे आयुष्य असते. विश्वचषकाच्या निमित्ताने क्लबधारी खेळाडू देशाचा झेंडा हातात घेतात. मात्र देशासाठी खेळत असताना या खेळाडूंच्या माध्यमातून त्यांचे क्लब्ज लाखोंची कमाई करीत आहेत. विश्वचषकासाठी अंतिम संघात निवड झाल्यापासून ते विश्वचषकातील प्रवास संपेपर्यंत प्रत्येक क्लबकडून आपल्या खेळाडूंना देशासाठी खेळण्यासाठी परवानगी दिली जाते. या अनुमतीसाठी फिफातर्फे या क्लब्जना प्रत्येक खेळाडूमागे दरदिवशी विशिष्ट रक्कम अदा केली जाते. या समीकरणामुळे ज्या क्लब्जचे जास्त खेळाडू, त्या क्लबला मिळकत जास्त हे ओघानेच आले. त्यामुळे एरवी एका क्लबसाठी खेळणारे दोन फुटबॉलपटू विश्वचषकात देशाची जर्सी परिधान करून एकमेकांसमोर उभे राहतात. परस्परविरोधी संघात असले तरी फायदा क्लबचाच होतो.
२३ सदस्यीय राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूंचा या संरचनेसाठी विचार होतो. या विश्वचषकासाठी फिफा एका खेळाडूमागे प्रतिदिवशी २,८०० डॉलर्स एवढी रक्कम क्लब्जना देत आहे. जागतिक अर्थव्यवस्था, ज्या देशात विश्वचषक होतो आहे त्या देशाची अर्थव्यवस्था, विश्वचषकासाठी एकूण तरतूद या घटकांचा परामर्श घेऊन ही रक्कम निश्चित करण्यात येते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात क्लब्जच्या खेळाडूसाठी प्रतिदिवशी १,६०० डॉलर्स इतकी रक्कम देण्यात आली होती. यंदा या रकमेत वाढ झाली आहे. त्या वेळी सर्वाधिक खेळाडू देणाऱ्या बार्सिलोनाने ८,६६,२६७ डॉलर्स एवढी प्रचंड कमाई केली होती. बायर्न म्युनिक दुसऱ्या तर चेल्सी तिसऱ्या क्रमांकावर होता. यंदा सर्वाधिक खेळाडू पुरवणारा क्लब एक दशलक्ष डॉलर्सची कमाई करण्याची शक्यता आहे. फिफाने क्लब्जना देण्याची रक्कम म्हणून ७० दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली आहे. २०१०च्या विश्वचषकात यासाठी ४० दशलक्ष डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली होती.
क्लबच्या विविध स्तरांवरील स्पर्धातून घडत हे खेळाडू मोठे झालेले असतात. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, सीरी ए या काही नावाजलेल्या लीग स्पर्धा. प्रत्येक क्लब हे एखाद्या संस्थानासारखे. जगातला सर्वोत्तम खेळाडू आपल्या ताफ्यात असावा यासाठी व्यावसायिक युद्ध रंगते. मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेड या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये रंगणारे द्वंद्व किंवा रिअल माद्रिद आणि बार्सिलोना यांची कडवी टक्कर, ही जगभरातल्या चाहत्यांसाठी पर्वणीच. विश्वचषकाच्या निमित्ताने जगभरातल्या तगडय़ा क्लब्जमध्ये जोरदार मुकाबला रंगला आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडू आमच्या ताफ्यात आहे, तो देशासाठीही अभिमानास्पद कामगिरी करीत आहे, आमचे नाणे कसे खणखणीत आहे, हे दाखवण्यासाठी बडय़ा क्लब्जचे सर्वेसर्वा ब्राझीलमध्ये ठाण मांडून आहेत. विश्वचषकाच्या निमित्ताने नवे प्रतिभावान खेळाडू समोर येत आहेत. भविष्यातले तारे असणाऱ्या या खेळाडूंना आता कमी किमतीत आपल्या क्लबमध्ये सामील करून घेण्यासाठी अहमहमिका आहे.
ज्या क्लबपटूंचे संघ विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील, त्यांची गंगाजळी वाढतच जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक खेळाडू पुरवणाऱ्या बायर्न म्युनिकचे उदाहरण बोलके आहे. त्यांचे तब्बल १५ खेळाडू विश्वचषकात आहेत. फिलीप लॅम, बॅस्टिअन श्वाइनस्टायजर, मॅन्युअल न्युअर, थॉमस म्युलर, टोनी क्रुस, मारिओ गोटेझ, जेरोम बोइटंग हे बायर्नपटू जर्मनीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. डांटे (ब्राझील), डॅनियल व्हॅन ब्युटेन (बेल्जियम), झेरदान शकिरी (स्वित्र्झलड), आर्येन रॉबेन (नेदरलँड्स), झाव्ही मार्टिनेझ (स्पेन), मारिओ मंडुझुकिक (क्रोएशिया) आणि ज्युलियन ग्रीन (अमेरिका) एवढय़ा विविध संघांमध्ये बायर्नचा संघ व्यापला गेला आहे. या बहुतांशी खेळाडूंच्या संघांनी बाद फेरी गाठली आहे. त्यांच्या संघांनी एकेक टप्पा आगेकूच करणे क्लबच्या व्यावसायिक हिताचे आहे. सर्वाधिक खेळाडू बायर्न म्युनिकचे असले तरी एका स्पर्धेचे सर्वाधिक खेळाडू पुरवण्याचा मान इंग्लिश प्रीमिअर लीगकडेच आहे. त्यांचे तब्बल १०५ खेळाडू रिंगणात आहेत. मात्र यांपैकी बहुतांशी खेळाडूंच्या संघांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आल्याने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये घट झाली आहे. एकंदरीत विश्वचषकामध्ये देशांदरम्यान मुकाबला होत असला तरी खरी चुरस क्लब्ज मिळवत असलेल्या व्यावसायिक नफ्यामध्ये आहे. क्लब की देश याचे उत्तर देण्याऐवजी देशाच्या माध्यमातून क्लब असे मुत्सद्दी धोरण रूढ होताना दिसते आहे.