फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अनपेक्षित धक्के बसत असल्यामुळे सट्टेबाजारात कमालीची रंगत आली आहे. बलाढय़ जर्मनीला बरोबरीत रोखणाऱ्या घानाने सट्टेबाजांचे आडाखे पुन्हा एकदा चुकविले. जर्मनीसाठी ३५ पैसे आणि घानासाठी तीन रुपये देऊ करणाऱ्या सट्टेबाजांना मोठे नुकसान सोसावे लागले. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातही सामना बरोबरीत सुटण्यासाठी सट्टेबाजांनी चांगला भाव देऊ केला होता. असा एकही दिवस गेला नाही की, सट्टाबाजारात पहिल्या पाच संघांच्या भावामध्ये चढउतार झाला नाही. ब्राझील आजही अग्रक्रमांकावर असला तरी त्यांचा भाव घसरला आहे. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातही ब्राझील, जर्मनी आणि अर्जेटिना यांच्यात कमालीची चुरस आहे. भारतीय सट्टाबाजारातही या संघांच्या भावामध्ये (ब्राझील- ३५ पैसे, जर्मनी- ४० पैसे आणि अर्जेटिना- ४५ पैसे) फार मोठा फरक नाही. सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये फ्रान्सच्या करिम बेन्झेमाचे नाव सट्टेबाजारात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ थॉमस म्युलर, लिओनेल मेस्सी, नेयमार, रॉबिन व्हान पर्सी यांचा क्रमांक लागतो. भारतीय सट्टेबाजारातून आता ख्रिस्तियानो रोनाल्डोची लोकप्रियता घसरली आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला जोरदार भाव देणारे सट्टेबाजही आता मागे आले आहेत. पंटर्सनीही म्युलर, मेसी, पर्सी यांच्याकडे मोर्चा वळविला आहे.
आजचा भाव :
ऑस्ट्रेलिया- भाव नाही (८/१); स्पेन- ४० पैसे (२/५)
नेदरलँड- ८५ पैसे (१७/१०); चिली- ९५ पैसे (१९/१०)
कॅमेरून- १२ रुपये (२५/१); ब्राझील- १० पैसे (१/७)
क्रोएशिया- ८० पैसे (८/५); मेक्सिको- सव्वा रुपया (२/१)
निषाद अंधेरीवाला

‘ब्राझील २०१४’ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप
तात्काळ माहितीच्या देवाणघेवाणासाठी लोकप्रिय माध्यम म्हणजे ‘व्हॉट्स अ‍ॅप’. मित्रपरिवार असो की एका कार्यालयात काम करणाऱ्यांचा ‘ग्रुप’ असो, या सर्व गटांमध्ये आता हळूहळू फुटबॉलचा फीव्हर जाणवू लागला आहे. कधी अंतर्मुख करायला लावणाऱ्या तर कधी हसायला भाग पाडणाऱ्या संदेशांमध्ये फुटबॉल विश्वचषकासंदर्भातील संदेशांचीही सध्या भर पडत आहे. विश्वचषक स्पध्रेतील महत्त्वाच्या संघांची ताजी स्थिती व्हॉट्स अ‍ॅपमधील ‘ग्रुप’प्रमाणे मांडण्यात आलेला हा ताजा संदेश लोकप्रिय झाला आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या ‘ग्रुप’मध्ये ‘नुकतेच जॉइन केलेले’, ‘ग्रुप सोडलेले’, ‘ऑनलाइन असणारे’ आणि ‘लास्ट सीन’ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. विश्वचषकात दमदार आगेकूच करणारे संघ ‘ऑनलाइन’ सदरात आहेत. बाद फेरीची आशा बाळगणारे संघ ‘ऑडियो रेकॉर्ड’ करत आहेत. मोठय़ा संघांना नमवत बाद फेरी गाठणाऱ्या कोस्टा रिकाच्या संघाला नुकतेच या ग्रुपवर अ‍ॅड करण्यात आले आहे.
सागरी दिवाणखाना!
वाफाळता चहाचा कप आणि खमंग भज्यांच्या साथीने दिवाणखान्यातल्या टीव्हीवर फुटबॉलचा वेगवान थरार अनुभवायला प्रत्येकाला आवडते. हाच थरार खुल्या आकाशाखाली, रम्य सागरी किनाऱ्यावर अनुभवायला मिळाला तर ‘सोने पे सुहागा’. मुबलक प्रमाणावर समुद्रकिनारे असलेल्या ब्राझीलमधील कोपाकॅबाना समुद्रकिनाऱ्यावर चाहत्यांसाठी सामने पाहण्यासाठी भव्य टीव्ही स्क्रीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. जर्मनी विरुद्ध घाना या रंगतदार सामन्याचा या किनाऱ्यावर आनंद लुटणारे हे चाहते.