काही खेळाडू स्वकर्तृत्व आणि कौशल्याच्या जोरावर यश, लोकप्रियता मिळवतात. त्यानंतर महान खेळाडूंच्या मांदियाळीत त्यांना स्थान दिले जाते. पण काही खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करूनही प्रसिद्धीच्या वलयापासून दूरच राहतात. मिरोस्लाव्ह क्लोस हे त्यापैकीच एक उदाहरण. फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याच्या रोनाल्डोच्या विक्रमाशी क्लोसने रविवारी बरोबरी साधली असली तरी त्याचे कर्तृत्व अद्याप अधोरेखित झालेले नाही. सर्वाधिक गोलांचा विक्रम आपल्याला गमवावा लागेल, याची रोनाल्डोला पुरेपूर कल्पना आहे. येत्या काही दिवसांत क्लोस हा विक्रम आपल्या नावावर करेलही, तरीही रोनाल्डो हा आधुनिक काळातील महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत कायम असेल. पण क्लोसच्या बाबतीत तसे घडेल का?
फिफा विश्वचषकात सर्वाधिक १५ गोल नावावर असलेल्या क्लोसने सलग चार विश्वचषकांत गोल करणारे महान फुटबॉलपटू पेले आणि जर्मनीचे उवे सीलेर यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवण्याची किमया रोनाल्डो, पेले, गेर्ड म्युलर यांनीही केली, पण या सर्वानी आपापल्या संघांना विश्वचषक जिंकून देण्याची करामत साधली. शतकातील सर्वोत्तम खेळाडू असा नावलौकिक मिळवणाऱ्या पेले यांनी ब्राझीलला तब्बल तीन विश्वचषक जिंकून दिले. रोनाल्डो हा ब्राझीलला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा मुख्य भाग होता. गेर्ड म्युलर यांनी १९७४मध्ये पश्चिम जर्मनीसाठी ही किमया करून दाखवली. पण पेले, रोनाल्डो काय किंवा गेर्ड म्युलर काय, या सर्वानी आपल्या हिमतीच्या जोरावर आपापल्या संघाला विश्वचषक जिंकून दिला, हे विशेष. रोनाल्डोने क्लब आणि देश या दोन्ही स्तरांवर यश मिळवले. क्लोस मात्र क्लब स्तरावर तितकी उंची गाठू
शकला नाही.
क्लोस हा पोलंडमध्ये जन्मलेला, पण १९८६पासून कुसेल, जर्मनी येथे स्थायिक झालेला. कम्युनिस्ट चळवळीमुळे पोलंड सोडून त्याचे कुटुंब जर्मनीमध्ये आले. पण त्यांना निर्वासितांच्या छावणीत अन्य पाच कुटुंबांसहित एकाच खोलीत नऊ दिवस घालवावे लागले. याच छावणीत राहात असताना क्लोस पहिल्यांदा फुटबॉल खेळला. फुटबॉलचे धडे गिरवल्यानंतर आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडायचे की कर्मभूमीला प्राधान्य द्यायचे, हा प्रश्न त्याला सतावू लागला. पण क्लोसने कर्मभूमीला प्राधान्य दिले. सध्याच्या घडीला जर्मनीतर्फे सर्वाधिक ७० गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, त्याने गोल केलेल्यांपैकी एकही सामना जर्मनीने गमावलेला नाही. जर्मनीतर्फे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो लोथार मॅथ्यूस यांच्यानंतरचा पहिला खेळाडू आहे.
२००२चा विश्वचषक जर्मनीसाठी संमिश्र यशाचा ठरला. अंतिम फेरीत धडक मारूनही युवा ब्राझील संघासमोर जर्मनीला शरणागती पत्करावी लागली ती गोलरक्षक ऑलिव्हर कान निष्प्रभ ठरल्यामुळे. पण या स्पर्धेत हेडरद्वारे पाच गोल करत त्याने नवख्या क्लोसने आपली छाप पाडली होती. विशेष म्हणजे एका स्पर्धेत हेडरद्वारे सर्वाधिक पाच गोल करण्याचा त्याचा विक्रम आजही अबाधित आहे. २००६मध्ये जर्मनीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, पण सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकात पाच गोल करून क्लोसने ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावला. २०१०मध्ये फक्त उपान्त्य फेरीच्या सामन्यात स्पेनविरुद्ध गोल करण्यात तो अपयशी ठरला, पण चार गोल झळकावत त्याने गोलसंख्या १४वर नेली.
आता दुखापतीमुळे जवळपास दीड वर्षांच्या कालावधीनंतर स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर असलेला ३४ वर्षीय क्लोस पुन्हा एकदा जर्मनीच्या ताफ्यात परतला आहे. पोर्तुगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४-० असा दणदणीत विजय मिळवणाऱ्या जर्मनी संघात त्याला संधी मिळाली नव्हती, पण घानाविरुद्ध मिळालेल्या संधीचे सोने त्याने दोन मिनिटांनीच केले. जवळपास प्रत्येक विश्वचषकात गोल करणाऱ्या क्लोसला अद्याप आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देता आला नाही. म्हणूनच महान खेळाडूंच्या यादीत त्याला कधीच स्थान मिळू शकले नाही. आता अखेरच्या विश्वचषकात तरी तो जर्मनीला विश्वचषक जिंकून देऊन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.