मनदीप सिंगच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर रांची ऱ्हिनोज संघाने उत्तर प्रदेश विझार्ड्स संघाचा ४-२ असा पराभव करीत हॉकी इंडिया लीगमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत दिल्ली व्हेवरायडर्सने पंजाब वॉरियर्सचे आव्हान ३-१ असे परतविले. आता रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत दिल्ली आणि रांची हे संघ जेतेपदासाठी एकमेकांशी झुंजतील.
मनदीपने चौथ्या व ६५ व्या मिनिटाला गोल करीत रांची संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला सामन्यातील ‘सवरेत्कृष्ट गोल करणारा खेळाडू’ व ‘सामनावीर’ अशी दोन्ही पारितोषिके देण्यात आली. निक विल्सनने ३०व्या व ६३व्या मिनिटाला गोल करीत त्याला चांगली साथ दिली. उत्तर प्रदेश संघाकडून डय़ुन डी नुईजीर याने १५व्या मिनिटाला तर नितिन थिमय्या याने ५४व्या मिनिटाला गोल केला.
साखळी गटात केवळ एकच सामना गमाविणाऱ्या दिल्ली संघाने पंजाबला ३-१ असे हरविले. त्यांच्याकडून आंद्रेस मीरबेल याने १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केला तर ३३व्या मिनिटाला त्याचा सहकारी रुपिंदरसिंग याने पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलात करत २-० अशी आघाडी मिळवून दिली. तथापि पुढच्याच मिनिटाला पंजाबच्या जेमी ड्वायर याने मैदानी गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. ६८व्या मिनिटाला दिल्लीच्या लॉईड नॉरिस जोन्सने अप्रतिम गोल करीत संघास ३-१ असे सुस्थितीत नेत विजय मिळवून दिला.