क्रिकेटचे माहेरघर असलेल्या इंग्लंडमध्ये शतक नोंदविणे हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते. भारताचा सलामीवीर मुरली विजयने हे स्वप्न साकार केल्याने भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद २५९ धावांपर्यंत समाधानकारक मजल मारता आली.
विजयने जबाबदारीने फलंदाजी करीत कसोटी कारकीर्दीतील चौथे शतक (नाबाद १२२) पूर्ण केल्यानंतर बॅट उंचावत आपला आनंद व्यक्त केला. प्रेक्षकांनी उभे राहून त्याला अभिवादन केले. या खेळीत त्याने चेतेश्वर पुजारा (३८), अजिंक्य रहाणे (३२) व कर्णधार महेंद्रसिंह धोनी (नाबाद ५०) यांच्या साथीने अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या, हेच  भारताच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले.  इंग्लंडकडून अँडरसनने प्रभावी गोलंदाजी करीत बळी घेतले. स्टुअर्ट ब्रॉडने १९ षटकांमध्ये केवळ २६ धावांमध्ये एक बळी घेत भारतीय फलंदाजांवर चांगले नियंत्रण ठेवले.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. परंतु गौतम गंभीर या अनुभवी फलंदाजाऐवजी अजिंक्य रहाणेला भारतीय संघ व्यवस्थापनाने
पसंती दिली.
मुरली विजय १२२*
चेंडू २९४
चौकार २०
षटकार १
धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय खेळत आहे १२२, शिखर धवन झे. प्रायर गो.अँडरसन  १२, चेतेश्वर पुजारा झे.बेल गो. अँडरसन ३८, विराट कोहली झे.बेल गो. ब्रॉड १, अजिंक्य रहाणे झे. कुक गो. प्लंकेट ३२, महेंद्रसिंह धोनी खेळत आहे ५०, इतर ४ (लेगबाइज ४), एकूण ९० षटकांत  ४ बाद २५९.
बाद क्रम : १-३३, २-१०६, ३-१०७, ४-१७८
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २१-६-७०-२ , स्टुअर्ट ब्रॉड १९-८-२६-१,  बेन स्टोक्स १९-४-४७-०, लियाम प्लंकेट २१-४-५६-१, मोईन अली ९-०-५०-०, जो रुट- १-०-६-०