दिवसरात्र कसोटीच्या नव्या पर्वाला प्रारंभ
दुपारी सुरू झालेली कसोटी आणि गोलंदाजांच्या हाती गुलाबी चेंडू अशा सर्वस्वी नव्या परिमाणांसह पहिल्यावहिल्या दिवसरात्र कसोटीतही गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा डाव २०२ धावांतच आटोपला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची २ बाद ५४ अशी स्थिती आहे.
दिवसरात्र कसोटीत जोश हेझलवूड गुलाबी चेंडूसह बळी मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याने मार्टिन गप्तीलला बाद केले. मालिकेत सातत्याने धावा करणाऱ्या केन विल्यमसनला मिचेल स्टार्कने पायचीत केले. रॉस टेलरला पीटर सिडलने तंबूत परतावले. त्याने २२ धावा केल्या.
ब्रेंडन मॅक्क्युलम अवघ्या ४ धावा करून माघारी परतला. स्टार्कनेच त्याला बाद केले. सलामीवीर टॉम लॅथमने अर्धशतकाची नोंद केली. मात्र त्यानंतर लगेचच नॅथन लिऑनने त्याला बाद केले. पदार्पणवीर मिचेल सँटनरने ३१ तर यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅडले वॉटलिंगला २९ धावा करता आल्या. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्हन स्मिथ २४ तर अ‍ॅडम व्होग्स ९ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ १४८ धावांनी पिछाडीवर आहे.

ह्य़ूजला श्रद्धांजली
एक वर्षांपूर्वी उसळता चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे आकस्मिक निधन झालेल्या फिलीप ह्य़ूजला श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या वर्षी २७ डिसेंबरला सिडनी क्रिकेट मैदानावर स्थानिक लढतीदरम्यान शॉन अबॉटचा चेंडू ह्य़ूजच्या डोक्यावर आदळला. ह्य़ूज मैदानात कोसळला, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र काही दिवसांतच त्याचे निधन झाले. ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी दंडाला काळी फीत लावून ह्य़ूजला आदरांजली वाहिली.