ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युजेसच्या मृत्यूनंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. त्यामुळे ब्रिस्बेन येथे ४ डिसेंबरपासून सुरू होणारी पहिली कसोटी आता १२ ते २६ डिसेंबरच्या काळात खेळवण्यात येणार आहे. ‘दी ऑस्ट्रेलियन’ने दिलेल्या माहितीनुसार, अॅडलेड येथे (१२ ते १६ डिसेंबर) होणारी दुसरी कसोटी आणि मेलबर्न येथे (२६ ते ३० डिसेंबर) होणारी तिसरी कसोटी या दरम्यानच्या कालावधीत पुढे ढकलण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचे नियोजन करण्यात येईल.
फिलिप ह्युजेसच्या हृदयद्रावक मृत्यूमुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू शोकसागरात बुडून गेले आहेत. या घटनेचे साक्षीदार असलेले अनुभवी क्रिकेटपटू शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर आणि ब्रॅड हॅडिन यांनी आम्ही स्पर्धात्मक क्रिकेटसाठी मानसिकदृष्टय़ा अद्याप सावरलो नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचे पुनर्नियोजन करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, ह्युजेसच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याचे पार्थिव त्याच्या घरी मॅक्सव्हिले येथे नेण्यात येणार आहे. जर खेळाडू तिथे हजर राहिले तर, पुढील दिवशी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याकडे लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण जाईल असे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी सांगितले होते.