वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी. इंग्लंडमध्ये जसे लॉर्ड्सला महत्त्व आहे, तसेच भारतात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला. त्यामुळेच विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा मान वानखेडे स्टेडियमला देण्यात आला. या मैदानावर आजमितीपर्यंत अनेक कसोटी आणि एकदिवसीय सामने रंगले. आतापर्यंत काही आयपीएलचे सामने झाले असले तरी एकही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना झालेला नाही. भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या रुपात पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना वानखेडेवर खेळवण्यात येणार आहे.
२३ ते २९ जानेवारी १९७५ साली वानखेडेवर पहिला सामना रंगला. या कसोटी सामन्यात बाजी मारली ती वेस्ट इंडिजने. त्यानंतर आतापर्यंत वानखेडेवर तब्बल २३ कसोटी सामने खेळले गेले. या २३ सामन्यांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर ७ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तर सात सामने अनिर्णित राहिले. कसोटी सामन्यांमध्ये भारताला वानखेडेवर २००४नंतर एकही विजय मिळवता आलेला नाही. २००४नंतर इंग्लंडनेच आपल्याला दोनदा पराभूत केले आहे.
नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात तर इंग्लंडने भारतावर १० विकेट्सने विजय मिळवला होता. वानखेडेवर कसोटीपेक्षा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताला चांगले यश मिळाले आहे. आतापर्यंत वानखेडेवर १६ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले असून ज्यामध्ये १० सामने भारताने जिंकले आहेत, तर ६ सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. १७ जानेवारी १९८७ला भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना वानखेडेवर झाला आणि भारताने तो १० धावांनी जिंकला. त्याच श्रीलंकेला तब्बल २५ वर्षांनी पराभूत करत भारताने विश्वचषकाला गवसणी घातली. इंग्लंडविरुद्ध भारताने तीन एकदिवसीय सामने वानखेडेवर खेळले असून त्यापैकी फक्त एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. वानखेडेवर अखेरचा सामना भारताने इंग्लंडविरुद्ध खेळला असून त्यामध्ये भारताला सहा विकेट्सने विजय मिळवता आला होता. कसोटीपेक्षा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला जास्त यश मिळाले आहे. आता ट्वेन्टी-२० सामन्याचा विजयी श्रीगणेशा वानखेडेवर होणार का, याकडेच दर्दी मुंबईकरांचे लक्ष लागले असेल.