भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याकरिता डेव्हिड वॉर्नरच्या उपलब्धतेविषयीची अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने वॉर्नरचा अंतिम संघात समावेश केला आहे. याचप्रमाणे अष्टपैलू मोझेस हेन्रिक्ससुद्धा आपले पदार्पण साजरे करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अंगठय़ाला झालेल्या दुखापतीतून सावरणारा वॉर्नर चेन्नईतील पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी होती. परंतु हा धडाकेबाज फलंदाज या सामन्यात खेळणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. वॉर्नरनेही मंगळवारी आपण पहिल्या कसोटीसाठी सज्ज होत असल्याचे म्हटले होते. ‘‘पहिल्या कसोटीत मी खेळणार आहे, याबद्दल मला विश्वास आहे. सराव करताना अंगठय़ाच्या संरक्षणासाठी मी कवच वापरले होते,’’ असे वॉर्नरने सांगितले.
पोर्तुगालमध्ये जन्मलेला अष्टपैलू खेळाडू हेन्रिक्सचे कसोटी पदार्पणाचे स्वप्न २२ फेब्रुवारीला सत्यात अवतरणार आहे. तथापि, ग्लेन मॅक्सवेलचा १२वा खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. चालू हंगामात दुखापतीमुळे काही सामन्यांत खेळू न शकलेल्या जेम्स पॅटिन्सनवर मिचेल स्टार्क आणि पीटर सिडल यांच्या साथीने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मदार असेल.
पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या कसोटीसाठी आश्चर्यकारकरीत्या फक्त नॅथन लिऑन या एकमेव फिरकी गोलंदाजाचा समावेश केला आहे. कप्तान मायकेल क्लार्क आणि वॉर्नर कामचलाऊ फिरकी गोलंदाजीचा भार सांभाळतील. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या कसोटीसाठी झेव्हियर डोहर्टी आणि अ‍ॅश्टन अगर या अन्य दोन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.
२६ वर्षीय हेन्रिक्स हा ऑस्ट्रेलियाचा ४३२वा पदार्पणवीर असेल. ऑस्ट्रेलियाच्या दोन सराव सामन्यांत त्याने चमकदार कामगिरी करताना १६ आणि ३३ धावा काढल्या. याशिवाय ४/१२ आणि १/३० अशी गोलंदाजीतही चांगली कामगिरी दाखवली. ईडी कोवनसोबत वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या डावाला प्रारंभ करेल. त्यानंतर फिल ह्युजेस, वॉटसन आणि क्लार्क हे मधल्या फळीत फलंदाजी करतील.

ऑस्ट्रेलियाचा संघ
मायकेल क्लार्क (कर्णधार), ईडी कोवन, मोझेस हेन्रिक्स, फिल ह्युजेस, नॅथन लिऑन, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, मॅथ्यू व्ॉड, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन.