भारतीय फुटबॉल संघातील स्थान कुणीही गृहीत धरू नका, असा इशारा भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाइन यांनी दिला आहे. संघात स्थान निश्चित करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला.

भारताला एएफसी आशिया चषक पात्रता स्पध्रेत किर्गिजस्तानचा सामना करावा लागणार आहे. त्या लढतीसाठी मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात भारतीय संघाचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दोन टप्प्यात पार पडणार असून मोहन बागान आणि बेंगळूरु एफसीचे खेळाडू दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार आहेत.

‘‘संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा रंगलेली आम्हाला पाहायची आहे आणि त्यामुळे कुणीही आपले संघातील स्थान निश्चित आहे, असे गृहीत धरू नये. या मोसमात अनेक सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे सर्व खेळाडूंनी तंदुरुस्त राहावे, याची खात्री करून आम्हाला घ्यायची आहे.’’ असे कॉन्स्टनटाइन यांनी सांगितले. ६ जून रोजी भारतीय संघ नेपाळविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. त्यानंतर बेंगळूरु येथे १३ जून रोजी किर्गिजस्तानविरुद्ध लढत होणार आहे. ‘‘२२ वर्षांखालील आठ खेळाडूंसह संभाव्य संघात नवोदितांना संधी देण्यात आली आहे. क्लबमधील कामगिरीच्या जोरावर त्यांची निवड करण्यात आली आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.