खेळाचा ज्वर चढलाच नाही; जाचक अटींमुळे उपक्रमाचा फज्जा

भारतामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये १५ सप्टेंबरला ‘मिशन वन मिलियन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याचा चांगलाच फज्जा उडाला. अनेक शाळा, महाविद्यालयांनी हा उपक्रम केवळ सेल्फी घेण्यापुरताच राबवल्याचे निदर्शनास आले आहे.

सहा ऑक्टोबरपासून भारतामध्ये प्रथमच फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचा प्रसार व प्रचारही जोरात सुरू आहे. याच पाश्र्वभूमीवर राज्यात फुटबॉलसाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे म्हणून सरकारने ‘मिशन वन मिलियन’ उपक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत सर्व शाळा व महाविद्यालयात १५ सप्टेंबरला फुटबॉल स्पर्धा घ्यायच्या होत्या. मात्र, यातील जाचक अटींमुळे अनेक शाळांनी केवळ छायाचित्रापुरता हा उपक्रम पार पाडला.

शहर, जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील शाळांना या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आदेश शिक्षण व क्रीडा विभागाने दिले होते. उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या शाळांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे प्रत्येकी तीन फुटबॉल वाटप करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अनेक शाळांनी याला प्रतिसाद दिला नाही. बहुतांश शाळांनी केवळ औपचारिकता पूर्ण केली.

उपक्रमांतर्गत शाळांना मोठे फलक लावून सेल्फी काढणे व तो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यास सांगण्यात आले होते. फुटबॉल सामन्यांचा खर्च शाळा व्यवस्थापनाला करायचा होता. त्यामुळेही अनेक शाळांनी काढता पाय घेतला. केवळ फलक लावून त्यापुढे काढलेला सेल्फी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे पाठवला, असे एका नामांकित शाळेच्या क्रीडा शिक्षकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर  सांगितले. उपक्रमासाठी वाटप करण्यात आलेले फुटबॉलही निकृष्ट दर्जाचे होते, असे त्यांचे म्हणणे होते.

नागपूर जिल्ह्य़ात जवळपास बाराशे शाळा आहेत. त्यांपकी ४२४ शाळा ग्रामीण भागात तर ३०५ नागपूर महापालिकेच्या आहेत. उर्वरित खासगी शाळा आहेत. मात्र, उपक्रमाच्या पूर्वी संकेतस्थळावर अधिकृतरीत्या केवळ ७३१ शाळांनी आपली नोंदणी केली होती. उर्वरित शाळांनी स्वारस्य दाखविले नाही.