दहा लाखांहून अधिक विद्यार्थी-युवकांचा सहभाग

‘महाराष्ट्र मिशन- एक दशलक्ष’ अभियानांतर्गत राज्यातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थी आणि युवक १५ सप्टेंबरला फुटबॉल खेळणार आहेत, अशी घोषणा राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या निमित्ताने देशातील एक कोटी १० लाख नागरिकांनी फुटबॉल खेळावा अशी कल्पना मांडली आहे. मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्र मिशन- एक दशलक्ष’ची घोषणा केली. मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते या अभियानाला सकाळी प्रारंभ होईल,’’ अशी माहिती तावडे यांनी दिली.

‘‘मुंबईतील डब्बेवाले, दिव्यांग, कर्करोगाने आजारी रुग्ण, आदी अनेक जण शिवाजी पार्क, ओव्हल मैदान, आझाद मैदान अशा विविध ठिकाणी फुटबॉल सामने खेळणार आहेत. आम्ही राज्यातील जवळपास ३० हजार शाळांमध्ये ९० हजार ते एक लाख फुटबॉलचे वाटप केले आहे,’’ अशी माहिती तावडे यांनी दिली आहे.

मुलांनी ई-गॅझेटपासून दूर राहावे हाच उद्देश -तावडे

‘‘ई-गॅझेटकडे शालेय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला असून मुलांचे मदानावर खेळण्याचे प्रमाण कमी होत आहे. आजची मुले विविध खेळाचे सामने मदानावर कमी तर मोबाइल किंवा संगणकावर अधिक प्रमाणात खेळताना दिसतात. त्यामुळे मुलांनी ई-गॅझेटपासून दूर राहावे आणि मदानावर फुटबॉलचा आनंद लुटावा, हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती तावडे यांनी यावेळी दिली.

वैशिष्टय़े

  • शाळा-महाविद्यालयांमधील मदानांव्यतिरिक्त सुमारे २०० मदानांची आखणी.
  • बुलढाणामध्ये आजोबा, मुलगा आणि नातू असे एकाच कुटुंबातील सदस्य फुटबॉलचा सामना खेळणार आहेत.
  • वांद्रे-कुर्ला संकुल येथे टाटा कर्करोग रुग्णालयामधील रुग्ण आणि विद्यार्थ्यांमध्येही फुटबॉल सामना रंगणार.
  • ठाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसमवेत आदिवासी पाडय़ांवरही फुटबॉल सामने होणार.
  • रायगडमध्ये नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये फुटबॉलचा खेळ रंगणार.
  • अलिबागमध्ये महिला गटांचे फुटबॉल सामने होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरूर सहभागी होणार.
  • सिंधुदुर्गमध्ये विद्यार्थ्यांचा समुद्रकिनारी फुटबॉल. तसेच केंद्रीय कारागृहातील कर्मचारी आणि कैदी यांच्यातील फुटबॉल सामना आकर्षण ठरणार.
  • फुटबॉलवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन
  • कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत न्यू पॅलेस मदानावर ६० संघांचे सामने रंगणार असून त्यासाठी ६० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक. शहरभर तालमी-मंडळांमध्ये फुटबॉल खेळण्यात येणार आहे.
  • सोलापूरमध्ये सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये आंतरवर्ग स्पर्धाचे आयोजन
  • पुण्यामध्ये सव्वाशेहून अधिक फुटबॉल क्लब या उपक्रमात सहभागी. मध्यवर्ती कारागृहातील फुटबॉल सामना, पोलिसांचा फुटबॉल सामना, मुला-मुलींना शाळेत सोडण्यास येत असलेल्या रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना आणि फ्री-स्टाईल फुटबॉल जगिलग या क्रीडाप्रकाराची प्रात्यक्षिके हे आकर्षण ठरणार.
  • उत्तर महाराष्ट्र-नाशिक विभागातील सुमारे एक लाख मुले-मुली फुटबॉल महोत्सवामध्ये सहभागी होणार.
  • अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासह विभागीय क्रीडा संकुलामध्ये मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.