व्हिसाच्या जाचक कायद्यामुळे मायदेशी परतण्याची वेळ
दिल्लीकर फुटबॉल गोलरक्षक अदिती चौहानने इंग्लिश लीग फुटबॉलमध्ये खेळण्याचा मान काही दिवसांपूर्वीच पटकावला. मात्र इंग्लंडमध्ये व्हिसा संदर्भातील नियमांमुळे अदितीला फुटबॉल मोहीम अर्धवट सोडून परतावे लागणार आहे.
२२ वर्षीय अदिती वेस्ट हॅम युनायटेड महिला संघासाठी खेळते. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिसामार्फत अदिती इंग्लंडमध्ये दाखल झाली. अदिती लौघबोरघ विद्यापीठातून क्रीडा व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम करते आहे. शिक्षण सुरू असतानाच ती विविध क्लब्सतर्फे आयोजित निवड चाचणी स्पर्धामध्ये सहभागी झाली. फुटबॉल असोसिएशनच्या नियमांनुसार विद्यार्थी व्हिसाद्वारे दाखल झालेली व्यक्ती महिला फुटबॉलमधील अव्वल दोन स्तरांतील क्लबचा भाग होऊ शकत नाही. या नियमामुळे अदिती तिसऱ्या डिव्हिजनमधील वेस्ट हॅम युनायटेड संघाशी करारबद्ध झाली. हा करार एक वर्षांचा आहे.
अदितीचा विद्यार्थी व्हिसाची मुदत काही दिवसांतच संपणार आहे. वेस्ट हॅम संघाने अदितीसाठी काम व्हिसाकरता प्रायोजकांची शोधाशोध सुरू केली आहे. मात्र वेस्ट हॅम तिसऱ्या डिव्हिजनमधील संघ आहे आणि त्यांचा दर्जा निम-व्यावसायिक असल्याने या क्लबच्या माध्यमातून ती काम व्हिसाकरता आवेदन सादर करू शकत नाही. किचकट नियमांमुळे अदितीला वेस्ट हॅम संघासोबतची कारकीर्द अर्धवट टाकून मायदेशी परतावे लागण्याची चिन्हे आहेत.
‘हे नियम अनाकलनीय आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या डिव्हिजनमधील क्लबसाठी मला खेळू देण्यात आले नाही. आता मला कोणत्याच डिव्हिजनसाठी खेळणे नाकारण्यात आले आहे,’ असे अदितीने सांगितले.