भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर सुरु झालेलं टीका-टिपण्ण्यांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी कुंबळेंच्या राजीनाम्यावरुन विराट कोहलीवर तोफ डागली आहे. विराट कोहलीचा सध्याचा भारतीय संघ हा ‘मुर्खांचा बाजार’ असल्याची खरमरीत टीका अजित वाडेकर यांनी घेतली आहे.

”महानता आणि नम्रता या गोष्टी हातात हात धरुन जातात, मात्र कोहली या बाबतीत नेमका विरुद्ध वागतो. अनिल कुंबळेंसारखा प्रशिक्षक लाभला हे विराट कोहलीच्या संघाचं भाग्य म्हणायला हवं. जर तुम्ही शिस्तीचे आहात तर तुम्ही चांगले प्रशिक्षक बनू शकत नाही असं होतं नाही. आज नाही तर उद्या विराटला त्याची चूक समजेल”, असं म्हणत वाडेकरांनी कुंबळेंना आपला पाठींबा दर्शवला आहे.

केवळ एक वर्षामध्ये विराट कोहलीचं कुंबळेंविषयी मत कसं काय बदललं? अनिल कुंबळेंच्या हाताखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत होता. मग तरीही विराट कोहली असं का वागला, त्याचं हे वागणं असमंजसपणाचं होतं, असंही वाडेकर म्हणाले. कुंबळे आणि कोहली यांच्यातला वाद हा अधिक चांगल्या पद्धतीने हाताळला जाऊ शकला असता. एक वर्षातली प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेंची कारर्कीद नक्कीच चांगली होती. त्यामुळे या वादात भारतीय संघाने एका हिऱ्याला गमावल्याची भावना वाडेकर यांनी बोलून दाखवली.

गेल्या काही दिवसात विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातल्या बेबनावाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. वेस्ट इंडिज दौऱ्यात प्रशिक्षक म्हणून दिलेली बढती नाकारत कुंबळेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीच्या वागण्यावर चांगलीच टीका करण्यात आली होती. कोहलीने मात्र आपण कुंबळेंचा क्रिकेटपटू म्हणून नेहमी आदर करत असल्याचं सांगत, ड्रेसिंग रुममधल्या गोष्टी आपण कधीच बाहेर आणणार नाही असंही सांगितलं.

कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. सध्या विरेंद्र सेहवाग, लालचंद राजपुत, दोड्डा गणेश, टॉम मूडी, रिचर्ड पायबस यांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे बीसीसीआयने वाढवून दिलेल्या मुदतीत आणखी कोण क्रिकेटपटू या पदासाठी अर्ज करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.