भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने आज वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण केलं. भारतीय संघातील सर्वात यशस्वी फिरकीपटू गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या अनिल कुंबळेने २००७ च्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सलग दोन दशकं गाजवलेल्या आपल्या कारकिर्दीत अनिल कुंबळेने कसोटीत ६१९ तर वन-डे सामन्यांमध्ये ३३७ बळी घेतले आहेत. भारताकडून कसोटीत एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रमही अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनिल कुंबळे क्रिकेट प्रशासनात मग्न राहिले. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. यानंतर काहीकाळासाठी अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं. अनिल कुंबळेंच्या कारकिर्दीत भारताने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांना घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं. आयसीसी चॅम्पियन्स करंडकातही कुंबळेंच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र अंतिम फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर कर्णधार विराट कोहलीसोबतच्या मतभेदांमुळे त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

मात्र आजच्या दिवशी अनिल कुंबळेच्या सर्व माजी सहकाऱ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काही प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनीही अनिल कुंबळेला शुभेच्छा दिल्या आहेत.