आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला भारताचा माजी गोलंदाज एस. श्रीशांत आपल्या नवीन करिअरची सुरुवात करतोय. मात्र हे करिअर क्रिकेटशी संबधीत नसून चक्क चित्रपटक्षेत्राशी संबंधीत आहे.

श्रीशांतची प्रमुख भूमिका असलेला ‘टीम ५’ हा सिनेमा पुढच्या महिन्यात १४ तारखेला सिनेमागृहात झळकणार आहे. सुरेश गोवींद यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, प्रोफेशल बाईकर्सच्या आयुष्यावर चित्रपटाची कथा बेतलेली आहे. निक्की गलरानी ही अभिनेत्री श्रीशांतची हिरॉईन म्हणून झळकणार असून दक्षिणेतले प्रसिद्ध संगीतकार गोपी सुंदर यांनी या सिनेमाला संगीत दिल्याची बातमी आहे.

एस.श्रीशांत हा भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू होता. अंतिम सामन्यातल्या अखेरच्या षटकात श्रीशांतनेच मिसबाह उल-हकचा झेल पकडत सामना भारताच्या बाजुने फिरवला होता. मात्र यानंतर आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अंकीत चव्हाण, अजित चंडेलासह श्रीशांतच नावही समोर आलं होतं. ज्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीशांतला अटकही केली होती.

जामीन मिळाल्यानंतर श्रीशांतने भारतीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र बीसीसीआयने त्याला प्रत्येकवेळा परवानगी नाकारली. त्यामुळे अखेर श्रीशांत आता ७० एमएमच्या पडद्यावर आपलं नशीब आजमवताना दिसणार आहे. श्रीशांतने आतापर्यंत २७ कसोटी, ५३ वन-डे आणि १० टी-२० सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

खेळाच्या मैदानात आक्रमक स्वभाळ आणि प्रतिस्पर्ध्याला माकडचाळे करुन दाखवत भडकवण्यात पटाईत असलेल्या श्रीशांतचं भारतीय क्रिकेटमधलं पुनरागमन जवळपास अशक्य आहे, त्यामुळे आता चित्रपटांमध्ये श्रीशांत कशी कामगिरी करतोय हे पहावं लागेल.