विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. घरच्या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत ४-१ ने विजय मिळवत भारतीय संघाने मालिका जिंकली. सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचा चांगला फॉर्म आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळी हे भारतासाठी या मालिकेतले काही जमेचे मुद्दे. मात्र कर्णधार विराट कोहलीला या मालिकेत फलंदाजीत हवीतशी चमक दाखवता आली नाही. ५ सामन्यांमध्ये विराटच्या नावावर केवळ १८० धावा जमा आहेत.

अवश्य वाचा – टी-२० नंतर आता टी-१० स्पर्धा, सेहवागही मैदानात उतरण्याची शक्यता

भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागच्या मते यात विराट कोहलीला कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही. याउलट कर्णधारपदाची जबाबदारी हातात आल्यानंतर विराटच्या फलंदाजीत सुधारणा झाल्याचेही वीरेंद्र सेहवागने म्हटलंय. ‘इंडिया टुडे’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने आपलं मत मांडलं. “सध्या भारताने आगामी न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं. या मालिकेत विराट कोहली आपल्या फॉर्मात परत येईल, यात शंका नाही.”

अवश्य वाचा – …आणि विराट कोहलीचं टोपणनाव जगजाहीर झालं!

यावेळी मोक्याच्या क्षणी आपली विकेट न फेकता चांगला खेळ करण्यासाठी सेहवागने विराटला खास गुरुमंत्र दिला. “मी आणि सचिन ज्यावेळी भारताच्या डावाची सुरुवात करायचो, त्यावेळी सचिनने सांगितलेली ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली. एक धाव घेण्याच्या नादात आपण आपली विकेट फेकणं चुकीचं आहे. चोरटी धाव घेण्याच्या नादात जेव्हा आपण धावबाद होतो तेव्हा आपल्या खेळाबद्दल आपण गंभीर नसल्याचं दिसून येतं. याऐवजी धोकादायक चेंडू सोडून देत, चेंडू टप्प्यात येताच त्याच्यावर प्रहार करणं केव्हाही चांगलं.” विराटने ही ट्रीक लक्षात ठेवली तरी त्याची फलंदाजी पूर्वीसारखी होईल असंही सेहवानगने म्हटलंय.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. वन-डे मालिकेत विराटला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नसल्याने टी-२० सामन्यात विराट कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – … म्हणून यंदा ऑस्ट्रेलियाचा संघ स्लेजिंग करत नाही; सेहवागने रहस्य उलगडले