भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीवर सध्या जगभरातील सर्वच माजी क्रिकेटपटू आणि अभ्यासकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोहलीने धावांचा पाठलाग करताना आवजर साकरलेल्या अप्रतिम खेळींची उदारणं दिली जातात. आपल्या देशातील खेळाडूंनी देखील विराटसारखी ध्येय्यासक्ती बाळगली पाहिजे, असेही अनेक माजी क्रिकेटपटूंनी याआधीही आपले मत व्यक्त केले आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे, पाकिस्तानातील एका स्पोट्स वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चासत्रात पाकच्या माजी क्रिकेटपटूंच्या मुखी केवळ विराटच्याच नावाची चर्चा होती. पाकिस्तानचे माजी गोलंदाज वसिम अक्रम, शोएब अख्तर आणि सकलेन मुश्ताक यांनी पाकिस्तानच्या संघाला आपली कामगिरी सुधारण्यासाठीचा सल्ला देताना विराट कोहलीच्या कामगिरीचे उदाहरण दिले. कोहलीच्या सरावाची पद्धत, त्याचे रुटीन, फिटनेसबाबतची जागरुकता आणि मेहनत याचे तोंडभरुन कौतुक करीत तो पाकिस्तानसह जगभरातील सर्वच खेळाडूंसाठी ‘रोल मॉडेल’ असल्याचे पाकच्या माजी क्रिकेटपटूंनी सांगितले. सकलेन मुश्ताक म्हणाले की, कोहली फिटनेसच्याबाबतीत कमालीचा जागरूग आहे. त्याने आपल्या दैनंदिन आहारातून बऱयाच गोष्टी वर्ज्य केल्या आहेत आणि तो अतिशय काटेकोरपणे डाएटचे पालन करतो. तो खूप उत्साही व्यक्ती आहे. जीममध्ये असो वा सराव किंवा खेळपट्टीवर तो सर्वच ठिकाणी शिस्तबद्ध असतो.

 

वसिम वक्रम यांनही विराटचे कौतुक करताना त्याने पुण्यात इंग्लंडविरुद्ध केलेल्या कर्णधारी कामगिरीचे उदाहण दिले. कोणतीच गोष्ट सोपी नसते, पण तुम्ही त्यासाठी किती मेहनत घेता यावर सारे अवलंबून असते. जर तुम्हाला जगातील सर्वोत्तम व्हायचे असेल तर तुम्हाला तितकीच मेहनत करणे देखील भाग आहे आणि तेच विराटने केले.

भारतीय संघाने नुकतेच इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, तर ट्वेन्टी-२० मालिकेसाठी देखील भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. २६ जानेवारी रोजी कानपूर येथे पहिला ट्वेन्टी-२० सामना होणार असून विराट कोहलीसह संपूर्ण संघाने सरावाला देखील सुरूवात केली आहे.