अवघ्या पाच दिवसांपूर्वी फॉर्म्युला वनचे विश्वविजेतेपद पटकावणा-या निको रोसबर्गने शुक्रवारी फॉर्म्युला वनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मी यशाचे शिखर गाठले, आज मी शिखराच्या सर्वोच्च स्थानी आहे आणि हीच योग्य वेळ असल्याचे सांगत रोसबर्गने निवृत्तीची घोषणा केली आहे.

फॉर्म्युला वन शर्यतीच्या यंदाच्या मोसमातील अखेरच्या शर्यतीत म्हणजेच अबु धाबी येथे मर्सिडीज संघाचा निको रोसबर्ग दुसऱ्या स्थानी आला, परंतु सरस गुणांच्या जोरावर त्याने संघसहकारी लुईस हॅमिल्टनकडून विश्वविजेत्या शर्यतपटूचा मान हिसकावला. २०१४ आणि २०१५ या मोसमात हॅमिल्टनने एकहाती विश्वविजेतेपद पटकावले होते. निको रोसबर्गने त्याला कडवी झुंज दिली होती. मात्र २०१६ च्या मोसमात शेवटी निको रोसबर्गला विश्वविजेतेपद गाठण्यात यश आले. मात्र विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर रोसबर्गने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.  ‘मी २५ वर्षांपासून स्पर्धेत खेळत आहे. तेव्हापासून फॉर्म्युला वनचे विश्वविजेतेपद गाठण्याची माझी इच्छा होती. अथक मेहनत आणि दुखापतीवर मात करत आज मी सर्वोच्च स्थानी पोहोचलो अशी रोसबर्गने म्हटले आहे.

जर्मनच्या ३१ वर्षीय रोसबर्गला फॉर्म्युला वनचा वारसा वडिलांकडून मिळाला होता. त्याचे वडील केके रोसबर्ग हे फॉर्म्युला वनचे १९८२ सालचे विश्वविजेते.. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत निकोने शर्यतपटू होण्याचा निर्धार केला. २००६ मध्ये त्याने बहारीन ग्रँड पिक्समधून फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणातील स्पर्धेत रोसबर्ग सातव्या स्थानी होता. रोसबर्गने २०६ ग्रँड प्रिक्समध्ये सहभाग घेतला होता. यातील २३ स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते. तर ५७ वेळा तो अव्वल तीन शर्यतपटूंमध्ये होता.

मर्सिडीजच्या संघाचे प्रमुख टोटो वॉल्फ यांनी निकोच्या निर्णयाचे स्वागत केले. निकोचा निर्णय ऐकून सुरुवातीला आम्हा सर्वांना धक्काच बसला. पण त्याचा निर्णय धाडसी असून यातून त्याच्या स्वभावातील कणखरपणा दिसून येतो असे त्यांनी सांगितले. आम्हाला त्याचा निर्णय मान्य असल्याचे वॉल्फ यांनी सांगितले. मर्सिडिजने २०१८ पर्यंत निकोच्या करारात वाढ केली होती.

जर्मनीच्या ध्वजाखाली निको शर्यतीत सहभाग होत असला तरी कारकीर्दीच्या सुरुवातीला त्याने फिनलँडचे प्रतिनिधित्व केले. निकोकडे या दोन्ही देशांचे नागरिकत्व असून त्याचे पाच भाषांवर प्रभुत्व आहे. मोनॅको ग्रां.प्रि. स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकणारा आणि सलग सात शर्यतींत विजेतेपद पटकावणारा निको हा चौथा शर्यतपटू आहे.