भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी कसोटी क्रिकेटमधील चार दिवसीय कसोटी सामन्यांना आणि टू-टायर टेस्ट सिस्टमला विरोध केला आहे. कसोटी सामन्यांना उपस्थित राहणाऱया प्रेक्षकांची घटती संख्या यावर कसोटी सामने चार दिवसांचे खेळवावेत, हा उपाय असू शकत नाही, असे मत अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ करण्यासाठी त्यावर केला जाणारा उपाय हा क्रिकेट खेळाला हानी पोहोचविणारा नाही, यावर आपण ठाम नसताना असे उपाय करणे योग्य ठरणार नाही. माझ्यामते अशा उपायांचा आपण विचारही करू नये, असेही ते पुढे म्हणाले.

कसोटी सामन्यांना प्रेक्षकांचा आकडा हा कमी का असतो? हा खरा प्रश्न असून, त्यासाठी कसोटीमधील उणीवांचा आपण अभ्यास करायला हवा. फुटबॉल, हॉकी, रग्बी या खेळांचा वेळ खूप कमी असतो. या खेळांचे सामने दोन तासांत संपतात. पण क्रिकेटचा एक सामना जवळपास तीन ते साडेतीन तासांचा असतो. त्यामुळे हे एक कारण असू शकते. वयोमानाचा विचार देखील करायला हवा. भारतात युवांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांची आवड ट्वेन्टी-२०, एकदिवसीय की कसोटी सामन्यांना आहे हे तुम्ही निश्चित ठरवू शकत नाही. तुम्ही प्रेक्षकांवर कसोटी सामने पाहण्याची बळजबरी करू शकत नाही, असेही ठाकूर पुढे म्हणाले. त्यामुळे कसोटी सामने चार दिवसांचे करून प्रेक्षक वाढतील हा गैरसमज आहे. हा उपाय होऊच शकत नाही, असे ठाम मत ठाकूर यांनी मांडले.