जपानला १-१ अशा बरोबरीत रोखले
दृढनिश्चयाने मदानात उतरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने जपानला १-१ अशा बरोबरीत रोखून चार संघाच्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत पहिल्या गुणाची कमाई केली. भारताकडून पूनम राणीने सातव्या मिनिटाला, तर जपानकडून हझुकी नागाईने १९व्या मिनिटाला गोल केला.
पहिल्याच आक्रमणात भारताला आघाडी घेण्याची संधी होती, परंतु पूनमचा प्रयत्न जपानची गोलरक्षक सकियो असानोने अपयशी ठरवला. दोन मिनिटांनंतर अनुराधा थोकचॉकने भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. त्यावर पूनमने अप्रतिम गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारताच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र झाली, परंतु अनेक संधी निर्माण करूनही भारतीय खेळाडूंना असानोची बचाव भिंत पार करण्यात अपयश आले. भारताचे दोन पेनल्टी कॉर्नरचे प्रयत्न असानोने हाणून पाडले.
दुसऱ्या सत्रातही हीच चढाओढ कायम होती. मात्र, १९व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नागाईने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. बरोबरीनंतर दोन्ही संघांमध्ये रंगलेली तांत्रिक खेळाच्या चढाओढीने सामन्यातील चुरस वाढवली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करण्यावर भर दिला.