वेम्बली स्टेडियमवर फ्रान्सच्या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन

इंग्लंड आणि फ्रान्स फुटबॉल संघांच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनी लंडनच्या वेम्बली स्टेडियवर फ्रान्सच्या राष्ट्रगीताचे गायन करून पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. जवळपास ७१,२२३ प्रेक्षकांमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि राजपुत्र विल्यम यांचीही उपस्थिती होती. वेम्बली स्टेडियमवर झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात इंग्लंडने डेल अली आणि कर्णधार वेन रुनी यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर २-० असा विजय मिळवला.
पॅरिसमधील हल्ल्यात १२९ जणांना प्राण गमवावे लागते, तर ३५० हून अधिक गंभीर झाले आहेत. यामध्ये फ्रान्सचा मध्यरक्षक लॅसाना दिआराने आपल्या चुलत भावाला गमावले, तर संघसहकारी अँटोइन ग्रिझमन याची बहीण थोडक्यात बचावली होती. त्यामुळे दिआराचे आगमन होताच प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हा सामना कडक पोलीस बंदोबस्तात खेळविण्यात आला.
दुसरीकडे जर्मनी आणि नेदरलँड यांच्यात हॅनोव्हर येथे होणारा सामना रद्द करण्यात आला. जर्मन पोलिसांना बॉम्ब हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच बेल्जियम आणि स्पेन यांच्यातील सामना रद्द झाला. मात्र, लंडनमधील सामन्याला प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. दहशतवादाला विरोध करण्यासाठी हा समुदाय एकवटला होता. इंग्लंडच्या पाठीराखे फ्रान्सच्या झेंडय़ासह स्टेडियमवर दाखल झाले होते.

इंग्लंड आणि फ्रान्स फुटबॉल संघांच्या खेळाडूंनी मैदानावर वर्तुळ करून श्रद्धांजली वाहिली. दुसऱ्या छायाचित्रात फ्रान्स संघटनेचे कार्याध्यक्ष ग्रग डीक, पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि राजपुत्र विल्यम राष्ट्रगीताचे गायन करताना.