जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी फ्रेंच खुल्या स्पर्धेत विजयासह तिसरी फेरी गाठली, मात्र त्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. महिलांमध्ये पेट्रा क्विटोव्हा आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी विजयी आगेकूच केली, मात्र पाचव्या मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विक्रमी १०वे जेतेपद पटकावण्यासाठी आतूर नदालने निकोलस अल्माग्रोवर ६-४, ६-३, ६-१ असा विजय मिळवला. अल्माग्रोविरुद्धच्या चौथ्या लढतीत नदालने एकही सेट न गमावता निर्विवाद विजय मिळवला. सामन्याची आकडेवारी नदालचे प्रभुत्व दर्शवणारी असली तरी अल्माग्रोने प्रत्येक गुणासाठी नदालला झुंजवले. अफाट ऊर्जा आणि ताकदवान खेळासाठी प्रसिद्ध नदालने चिवटपणे खेळ करत अल्माग्रोला निष्प्रभ केले. फ्रेंच खुल्या स्पर्धेत ६८-१ असे अद्भुत प्रदर्शन नावावर असणाऱ्या नदालची लढत आंद्रेय कुझनेत्सोव्ह आणि जुर्गेन मेल्झर यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. मारिन चिलीचने आंद्रेआ अर्नाबोल्डीवर ७-६, ६-१, ६-१ असा विजय मिळवला.
महिलांमध्ये जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या सेरेना विल्यम्सने अ‍ॅना लेना फ्राइडसामवर ५-७, ६-३, ६-३ अशी मात केली. १९ ग्रँडस्लॅम जेतेपदे आणि अव्वल मानांकित सेरेनाने पहिल्या सेटमध्ये भरपूर चुका केल्या. तिच्या सव्‍‌र्हिसमधील अचूकताही हरवली. या सगळ्याचा फायदा उठवत अ‍ॅनाने पहिला सेट नावावर केला. मानांकित खेळाडूंना स्पर्धेत सामोरे जावे लागणाऱ्या पराभवांची मालिका लक्षात घेत सेरेनाने खेळात आमूलाग्र सुधारणा केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये सगळा अनुभव पणाला लावत सेरेनाने विजय साकारला. पुढच्या लढतीत सेरेनाची लढत व्हिक्टोरिया अझारेन्काशी होणार आहे.
चौथ्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाने सिल्व्हिआ सोलर इसपिनोसाचा ६-७(४), ६-४, ६-२ असे नमवत तिसरी फेरी गाठली. तीन तास आणि ५० मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीत फ्रान्सेस्का शियोव्हेनने स्वेतलाना कुझनेत्सोव्हाला ७-६(११), ५-७, १०-८ असे नमवले. व्हिक्टोरिया अझारेन्काने राडेकावर ६-२, ६-३ असा सहज विजय मिळवत तिसरी फेरी गाठली.
पाचव्या मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. ज्युलिआ जॉर्ज्सने वोझ्नियाकीवर ६-४, ७-६(४) असा विजय मिळवला. पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या वोझ्नियाकीला या स्पर्धेद्वारे कारकीर्दीत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरण्याची संधी होती. मात्र दुसऱ्याच फेरीत पराभवामुळे वोझ्नियाकीला गाशा गुंडाळावा लागला.