विजेतेपदाच्या मानक ऱ्यांमध्ये स्थान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे यांनी पुरुष गटात, तर पेत्रा क्विटोवाने महिलांमध्ये सफाईदार विजय मिळवीत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील चौथ्या फेरीत धडक मारली.
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जोकोव्हिचने आपल्या दर्जास साजेसा खेळ करीत ऑस्ट्रेलियाच्या थानसी कोक्किनाकिसवर ६-४, ६-४, ६-४ असा विजय मिळविला. तिसरा मानांकित मरेला त्या तुलनेत एकतर्फीच विजय मिळाला. त्याने थानसीचा सहकारी निक किर्गिओसचा ६-४, ६-२, ६-३ असा दणदणीत पराभव केला. स्थानिक खेळाडूंचे आव्हान पेलविणाऱ्या जेरेमी चार्डी यानेही अपराजित्व राखले. त्याने बेल्जियमचा खेळाडू डेव्हिड गॉफिनचे आव्हान ६-३, ६-४, ६-२ असे सहज संपुष्टात आणले.
जोकोव्हिच याने थानसीविरुद्धच्या लढतीत पासिंग शॉट्स व नेटजवळून प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. संभाव्य विजेता म्हणून लोकप्रियता मिळविलेल्या या खेळाडूने अपेक्षेप्रमाणे या सामन्यात नियंत्रण राखले होते. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या मरे याने किर्गिओसविरुद्धच्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्याने फोरहॅण्डचे ताकदवान फटके व बेसलाइन व्हॉलीज असा चतुरस्र खेळ केला.
महिलांमध्ये चौथ्या मानांकित क्विटोवाने विजयी मालिका कायम ठेवताना रुमानियाच्या इरिना कॅमेलुवेलूला ६-३, ६-२ असे निष्प्रभ केले. सतरावी मानांकित खेळाडू सारा इराणीलादेखील चौथ्या फेरीत सहज प्रवेश मिळाला. तिने जर्मन खेळाडू आंद्रिया पेटकोव्हिक हिच्यावर ६-३, ६-३ अशी मात केली. या सामन्यांच्या तुलनेत आंद्रिया मितू या रुमानियाच्या खेळाडूला झगडावे लागले. तिने अनुभवी खेळाडू फ्रान्सेस्का शियाव्होनचे आव्हान ७-४, ६-४ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर संपविले.
 क्विटोवाने इरिनाविरुद्धच्या लढतीत सुरुवातीपासून नियंत्रण मिळविले होते. तिच्या वेगवान खेळापुढे इरिना हिला फारसा प्रभाव दाखविता आला नाही. इराणी हिने पेटकोव्हिकविरुद्धच्या सामन्यात क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच तिने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते.