महिला गटात गतविजेत्या गर्बिन मुगुरुझाची सलामी

विजेतेपदासाठी दावेदार असलेले राफेल नदाल व नोव्हाक जोकोव्हिच यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत धडाकेबाज प्रारंभ केला. महिलांमध्ये गतविजेत्या गर्बिन मुगुरुझाने झकास सलामी दिली.

नदालने फ्रान्सच्या बेनॉईट पिअरीवर ६-१, ६-४, ६-१ असा सफाईदार विजय मिळवला. जोकोव्हिचलाही स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सविरुद्ध ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळाला. महिलांमध्ये मुगुरुझाने इटलीची फ्रान्सेस्का शियाव्होनचे आव्हान ६-२, ६-४ असे संपुष्टात आणले. डेन्मार्कच्या कॅरोलीन वोझ्नियाकीला पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जेमी फोर्लिसविरुद्ध ६-३, ३-६, ६-२ असा विजय मिळवताना संघर्ष करावा लागला.

नदाल फ्रेंच खुल्या स्पध्रेत दहाव्यांदा विजेतेपदासाठी उत्सुक आहे. गतवर्षी त्याला येथे तिसऱ्या फेरीत मनगटाच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. यंदाच्या मोसमात नुकत्याच तीन एटीपी स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या नदालच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. दुखापतीचा लवलेशही न दाखवता त्याने फोरहँडचे जबरदस्त फटके व बिनतोड सव्‍‌र्हिसचा बहारदार खेळ केला. त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवताना बेसलाइनवरून व्हॉलीजचाही सुरेख उपयोग केला. त्याने शेवटच्या सेटमधील आठव्या गेममध्ये सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

जोकोव्हिचने ग्रॅनोलर्सविरुद्ध परतीच्या खणखणीत फटक्यांसह झंझावाती सव्‍‌र्हिसही केल्या. त्याने नेटजवळून प्लेसिंगचा कल्पकतेने खेळ केला. ग्रॅनोलर्सने थोडी फार लढत देण्याचा प्रयत्न केला, पण जोकोव्हिचने अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत हा सामना दोन तास २७ मिनिटांमध्ये जिंकला.

सेरेना विल्यम्स व मारिया शारापोव्हा यांच्या अनुपस्थितीत मुगुरुझाला यंदा विजेतेपद राखण्याची सुवर्णसंधी आहे. त्यादृष्टीने येथे तिने शानदार सलामी केली. तिने पासिंग शॉट्सबरोबर अचूक सव्‍‌र्हिस करीत शियाव्होनला नमवले. ११व्या मानांकित वोझ्नियाकीला फोर्लिसविरुद्ध सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागले. पहिला सेट तिने सहज घेतला, मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिला परतीचे फटके व सव्‍‌र्हिस यावर नियंत्रण ठेवता आले नाही. हा सेट तिने गमावला. परंतु तिसऱ्या सेटमध्ये तिला पुन्हा सूर गवसला. तिने खोलवर सव्‍‌र्हिस व परतीचे प्रभावी फटके असा खेळ  केला. सर्बियाच्या व्हिक्टर त्रिओकीने पुरुष एकेरीत रशियाच्या एवगेनी दोन्स्कोयला ७-६ (७-४), ६-४, ६-० असे हरवले. इंग्लंडच्या एलियाझ बेदेनीने अमेरिकेच्या रियान हॅरिसनचे आव्हान ६-४, ६-०, ३-६, ६-१ असे संपुष्टात आणले.