१६ वर्षांत पहिल्यांदा खेळ वाया; मरे उपांत्यपूर्व फेरीत

सोमवारी पावसाने केलेल्या मुसळधार सव्‍‌र्हिसमुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेतील नियोजित सामने रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली. २००० सालानंतर पहिल्यांदाच फ्रेंच स्पध्रेचा खेळ पावसामुळे थांबविण्यात आला आहे. ‘पावसामुळे आजच्या दिवसाचे सामने रद्द करण्यात येत आहेत,’ अशी माहिती स्पर्धेच्या ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे.

रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अ‍ॅण्डी मरे आणि रिचर्ड गॅस्क्युएट यांनी विजयी घोडदौड कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मरेने सहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित करताना अमेरिकेच्या जॉन इस्नरवर ७-६(११-९), ६-४, ६-३ असा विजय मिळवला. या स्पध्रेत तीन वेळा उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या मरेसमोर फ्रान्सच्या गॅस्क्युएटचे आव्हान आहे. मरेची गॅस्क्युएट विरुद्ध जय-पराजयाची आकडेवारी ७-३ अशी आहे आणि यातील दोन विजय हे फ्रेंच स्पध्रेत २०१० आणि २०१२ मध्ये मिळवले होते.

गॅस्क्युएटने पाचव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीचा ६-४, ६-२, ४-६, ६-२ असा पराभव करून पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले. नवव्या मानांकित गॅस्क्युएट पहिल्या सेटमध्ये २-४ अशा पिछाडीवर असताना पावसाच्या आगमनाने खेळ लांबला. त्यानंतर गॅस्क्युएटने जोरदार पुनरागमन करीत ही लढत जिंकली.

‘माझी सुरुवात निराशाजनक झाली होती, परंतु सर्वानी मला मदत केली आणि त्याविरुद्ध निशिकोरीला खेळणे अवघड होते. पावसानंतर सुरूझालेल्या सामन्यात त्याला साजेसा खेळ करता आला नाही आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला,’ अशी प्रतिक्रिया गॅस्क्युएटने दिली. १९८३मध्ये फ्रान्सच्या यॅन्निक नोआहने फ्रेंच खुली स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर पुरुष एकेरीत एकाही फ्रेंच खेळाडूला जेतेपद पटकावता आलेले नाही.