‘अमन की आशा, प्यार की भाषा, प्यार किया तो डरना क्या..’ हे बोल होते क्रिकेट चाचा (अब्दुल जलिल चौधरी) यांचे. पाकिस्तानमधून खास तिसरा एकदिवसीय सामना बघायला ते फिरोझशाह कोटला स्टेडियमवर आले होते. ‘‘दिल्लीमध्ये मी चौथ्यांदा आलो, इथे आल्यावर वेगळे काहीच वाटत नाही, लाहोरसारखेच दिल्ली आहे. इथले लोकही तसेच, राहणीमान, खाण-पिणेही तसेच. भारतात येणे मला कधीही आवडते आणि इथे आल्यावर नेहमीच मी माझ्या मित्रांच्या घरी राहतो, या वेळी पहिल्यांदाच हॉटेलवर थांबलो आहे. दोन्ही देशांतील सामान्य माणसांमध्ये एकमेकांबद्दल आदर आहे. पाकिस्तानमधल्या सामान्य लोकांना शांती हवी आहे, त्यासाठी हे घोषवाक्य आम्ही बनवले आहे. दोन्ही देशांनी सारे काही विसरून एकत्र यायला हवे, सामान्य माणसांची तर हीच भावना आहे,’’ असे चाचा म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रेक्षकांसाठी चाचा म्हणजे सेलिब्रेटी आहेत, बरेच जण त्यांच्याबरोबर छायाचित्र काढण्यासाठी उत्सुक होते. दोन्ही देशांतील प्रेक्षकांना ते या वेळी ‘एकमेकांना दुखावण्यासारखे काही बोलू नका, आपण सारे एकच आहोत’ असे म्हणत होते. वेळोवेळी प्रेक्षकांचा उत्साह वाढवत होते.
लाहोरहून सामना पाहण्यासाठी आलेल्या आबिद अली यांना येथे काहीसा वाईट अनुभव आला. ते म्हणाले की, ‘‘पाकिस्तानमधून भारतात येताना चांगल्या सोयीसुविधा नव्हत्या. त्याचबरोबर येथे दाखल झाल्यावर पोलीस स्थानकामध्ये जाऊन हजेरी द्यायची होती. हॉटेलवर आम्हाला सांगण्यात आले की, पोलीस स्थानकात आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवू, तुम्हाला जायची गरज नाही. पण दोन दिवसांनंतर आम्हाला समजले की, पाकिस्तानमधून आलेल्या प्रत्येकाने प्रत्यक्ष पोलीस स्थानकामध्ये हजेरी लावायची होती. आम्ही दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष गेलो नाही म्हणून प्रत्येक माणसाला १४०० रुपयांचा दंड लावण्यात आला. जवळपास ६० टक्के लोकांना हा दंड भरावा लागला.’’
लाहोरच्या खैजर अली यांचे भारतातील सोयीसुविधांबद्दलचे मत मात्र चांगले होते. ‘‘पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने तीन वेगवेगळे मध्यस्थ आमच्यासाठी ठेवले होते. त्यामुळे भारतामध्ये येताना आम्हाला कोणतीच समस्या जाणवली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पीसीबीला काही हॉटेल्सची यादी दिली होती, त्यामध्ये आम्ही सारे थांबलो आहोत.
भारतात मी पहिल्यांदाच येतोय, पण यानंतरही इथे यायला नक्कीच आवडेल. दोन्ही देशांतील लोकांमध्ये जास्त फरक नाही. इथे फक्त हातातील झेंडय़ामुळे तुम्हाला कोण भारतीय आणि कोण पाकिस्तानी हे कळू शकतं, अन्यथा दोन्ही देशांमधल्या लोकांमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये, विचारसरणीमध्ये जास्त फरक नाही. तुम्हीही पाकिस्तानात याल तेव्हा नक्कीच तुमचे थाटात स्वागतच होईल.’’