इंग्लिश फलंदाजांचा हल्ला ‘शॉर्ट लेग’वर
इंग्लंडच्या फलंदाजांनी शनिवारी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला खरा, पण या वेळी त्यांनी गोलंदाजांबरोबरच हल्ला केला तो ‘शॉर्ट लेग’वर. फिरकी गोलंदाजीला सामोरे जाताना इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने जोरदार फटका लगावला आणि तो चेंडू ‘शॉर्ट लेग’वर उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या बरगडय़ांवर बसला. चेंडूचा फटका इतका जोरदार होता की पुजारा कळवळला आणि त्याच क्षणी मैदानावर पडला. मैदानात वैद्यकीय सुविधा घेतल्यावरही त्याला अत्यवस्थ वाटू लागले आणि त्याला तंबूत परतावे लागले.
पुजाराच्या जागी ‘शॉर्ट लेग’वर राखीव खेळाडू म्हणून मुंबईकर अजिंक्य रहाणेला मैदानात बोलवण्यात आले, पण इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा ‘शॉर्ट लेग’ला लक्ष्य बनवले. केव्हिन पीटरसनने एक जोरदार फटका मारला आणि ‘शॉर्ट लेग’वर असलेला अजिंक्य दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतला; परंतु या दोघांच्या दुखापती गंभीर स्वरूपाच्या नसल्याचे सायंकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.     

स्वान नाबाद २०२!
ग्रॅमी स्वान हा सध्याच्या क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिरकीपटू आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले होते आणि शनिवारी २००वा बळी घेत त्याने हे सिद्ध करून दाखवले. दोनशे बळी घेणारा स्वान हा क्रिकेट जगतातील पाचवा ‘ऑफ-स्पिनर’ ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८००), भारताचा हरभजन सिंग (४०६), वेस्ट इंडिजचा लान्स गिब्स (३०९) आणि पाकिस्तानचा साकलेन मुश्ताक (२०८) यांनी दोनशे बळींचा टप्पा ओलांडला आहे. हा टप्पा पार करणारा स्वान हा इंग्लंडचा १४वा तर क्रिकेटविश्वातील ६०वा गोलंदाज ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी स्वानने फक्त एकच बळी मिळवला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याने तीन बळी मिळवले. हरभजन सिंग हा त्याचा २००वा बळी ठरला. हरभजननंतर भारताच्या धावसंख्येचा कणा ठरलेल्या चेतेश्वर पुजारालाही त्याने बाद केले. त्यानंतर झहीर खानला तंबूत धाडत त्याने भारताचा डाव संपुष्टात आणला.