* पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात
* श्रीलंकेचा भारतावर १३८ धावांनी विजय
लंकादहनाचा नारा देत यजमान भारत मैदानात उतरला खरा, पण त्यांच्या शस्त्रांमध्ये धार नव्हती आणि देहबोलीत धमक तर नव्हतीच. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर भारताने सपशेल शरणागती पत्करली आणि त्यांच्यावर पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की साखळी फेरीतच ओढवली. श्रीलंकेच्या २८३ धावांचा पाठलाग करताना पराभूत झालो तरी बाद फेरीत पोहोचण्यासाठी धावगतीच्या जोरावर भारतापुढे २५१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते, पण भारताचा श्वास १४४ धावांवर थांबला आणि यजमानांची मान शरमेने खाली झुकली. स्पर्धेतील सातव्या आणि आठव्या स्थानासाठी भारताची गाठ आता पाकिस्तानबरोबर ७ फेब्रुवारीला कटक येथे पडेल.
२८२ धावांचे आव्हान घेऊन भारत मैदानात उतरला ते दडपणाचे ओझे घेऊनच आणि याच दडपणाखाली त्यांचा श्वास कोंडला. ठराविक फरकाने भारताच्या फलंदाजांना तंबूत परतण्याची घाई झाली आणि श्रीलंकेने भारतावर सहज विजय संपादन करून ‘सुपर-सिक्स’ फेरीत प्रवेश केला. गेल्या १८ सामन्यांमध्ये श्रीलंकेने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय ठरला.
दिशाहीन गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा उचलत श्रीलंकेने २८२ धावांची मजल मारली. झुलान गोस्वामीने पहिल्याच षटकात श्रीलंकेला धक्का दिला, पण त्यानंतर मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरेख फलंदाजी करत भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला. यसोदा मेंडिस (५५), दीपिका रसंगिका (८४), शशिकला सिरीवर्धने (५९) आणि इशानी कौशल्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने धावांच्या राशी उभारल्या. अखेरच्या दहा षटकांमध्ये श्रीलंकेने ९४ धावा कुटल्या.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ५ बाद २८२ (दीपिका रसंगिका ८४ ; झुलान गोस्वामी ३/६३) विजयी वि. भारत : ४२.२ षटकांत सर्वबाद १४४ (रीमा मल्होत्रा ३८; चमानी सेनेवीरत्ने २/१०). सामनावीर : दीपिका रसंगिका.
      पराभवाने नक्कीच निराश झाले आहे. आमच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संघ २८२ धावा करेल, असे आम्हाला वाटले नव्हते. एकाही गोलंदाजाची कामगिरी चांगली झाली नाही. त्याचबरोबर पहिल्या ५० धावांमध्येच आम्ही तीन महत्वाचे बळी गमावले,  तिथेच आमच्या हातून सामना निसटला.
मिताली राज, भारताची कर्णधार
ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
कटक : मेग लॅनिंगच्या ११२ तर जेस कॅमेरुनच्या ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ७ विकेट्सनी मात केली. न्यूझीलंडतर्फे सुजी बेट्सने १०२ धावांची खेळी केली. केटी पर्किन्स (३९) आणि निकोला ब्राऊन (३९) यांनी उपयुक्त खेळी केल्याने न्यूझीलंडने २२७ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मेनिंग आणि कॅमेरुन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुपरसिक्स गटात प्रवेश पक्का केला.
दक्षिण आफ्रिका सुपर सिक्स गटात
कटक : मॅरिझन कॅपच्या शतक आणि तीन विकेट्स अशा शानदार अष्टपैलू खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा १२६ धावांनी धुव्वा उडवत पहिल्या विजयासह सुपर सिक्स गटात आगेकूच केली. २ बाद ९ अशा परिस्थितीत मैदानावर आलेल्या कॅपने एका बाजूने संयमी खेळी करत आफ्रिकेचा डाव सावरला. कॅपने नाबाद १०२ धावांची खेळी केली. डॅन व्हॅन निइकेर्कने ५५ धावा करत कॅपला चांगली साथ दिली. आफ्रिकेने ५० षटकांत २०७ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना आफ्रिकेच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली आणि त्यांचा डाव ८१ धावांतच आटोपला. कॅपनेच सर्वाधिक ३ बळी टिपले.
इंग्लंडचा सलग दुसरा विजय
मुंबई : इंग्लंडने आपला चांगला फॉर्म कायम राखत भारतापाठोपाठ वेस्ट इंडिजवरही मात करत सुपर सिक्स फेरी गाठली. इंग्लंडच्या विजयाची शिल्पकार ठरली ती गोलंदाज अन्या श्रुबसोले. अन्याने २१ धावांत ४ बळी टिपले. अरान ब्रिंडलने एकही धाव न देता ३ बळी घेत अन्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजचा डाव १०१ धावांत आटोपला. इंग्लंडतर्फे डॅनियल व्हॅटने ४० धावा केल्या
सुपर सिक्स फेरीचे वेळापत्रक
    दिनांक       सामने        ठिकाण    वेळ
    ७ फेब्रुवारी    भारत वि. पाकिस्तान    बाराबत्ती मैदान, कटक    स. ९.००पासून
    ८ फेब्रुवारी    ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई    स. ९.३०पासून *
        न्यूझीलंड वि. श्रीलंका    बीकेसी मैदान, मुंबई    स. ९.००पासून
        द.आफ्रिका वि. वेस्ट इंडिज    बाराबत्ती स्टेडियम, कटक    स. ९.००पासून
    १० फेब्रुवारी    ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई    स. ९.३०पासून *
        इंग्लंड वि. द.आफ्रिका    बाराबत्ती स्टेडियम, कटक    स. ९.००पासून
    ११ फेब्रुवारी    न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई    स. ९.३०पासून *
    १३ फेब्रुवारी    इंग्लंड वि. न्यूझीलंड    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई    दु. २.३०पासून *
        ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज    एमआयजी स्टेडियम, मुंबई    स. ९.००पासून
        द.आफ्रिका वि. श्रीलंका    बाराबत्ती स्टेडियम, कटक    स. ९.००पासून
    १५ फेब्रुवारी    ५ आणि ६ स्थानासाठी    बाराबत्ती स्टेडियम, कटक    स. ९.००पासून
        ३ आणि ४ स्थानासाठी    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई    स. ९.३०पासून *
    १७ फेब्रुवारी    अंतिम सामना    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई    दु. २.३०पासून *