टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने मैदानावरील फटकेबाजीने गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. निवृत्तीनंतर विरेंद्र सेहवागची मैदानावरची फटकेबाजी दिसत नसली तरी कॉमेंट्रीच्या माध्यमातून विरुची फटकेबाजी अनुभवता येते. विरुची ही फटकेबाजी क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरत आहे.

क्रिकेटपटूंचा वाढदिवस असो किंवा सरकारचा एखादा निर्णय..ट्विटरवर विरेंद्र सेहवागचे गंमतीशीर ट्विट्स लक्षवेधी असतात. दिल्लीकर असलेल्या विरुच्या ट्विटमध्ये विनोदी शैली आणि सडेतोड मत याचा मिलाप दिसून येतो. क्रिकेटच्या मैदानात विरेंद्रने स्फोटक फलंदाजी करत गोलंदाजांना रडवले होते. आता विरु त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यात आणी आणतो खरे पण ते हसून. हिंदी कॉमेंट्रीची धूरा सध्या विरेंद्र सेहवागकडे देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी आणि वन डे मालिकेत विरुच्या विनोदी फटकेबाजीचा अनुभव आला. न्यूझीलंडचा एक फलंदाज चांगला स्वीप मारतो असे विरुने सांगितले. पण त्यानंतर विरु थेट स्वच्छ भारतवर घसरला. तो फलंदाजऐवढे चांगले स्वीप मारतो की त्याला महापालिकेकडून सफाईचे कंत्राट मिळू शकते असे सेहवागने म्हटले आहे. तर व्ही व्ही एस लक्ष्मणचे हिंदी ऐकून मला थ्री इडियट्समधील चतूरची आठवण आली असेही त्याने म्हटले आहे.

कॉमेंट्री दरम्यान विरुने अमित मिश्राच्या वयावरुनही विनोद केले. अमित मिश्राचे कागदावरील वय ३३ वर्ष आहे. पण प्रत्यक्षात तो ३५ – ३६ वर्षाचा असावा. क्रिकेटमध्येही प्रत्येकजण वय लपवतोच असे विरुने कॉमेंट्री दरम्यान सांगताच हशा पिकला. न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टीलचे नाव गुप्टिल का पडले याचे विश्लेषणही त्याच्या शैलीत केले. मार्टिन हा गुप्ता होता. एकदा तो आजारी (ill) पडला आणि म्हणून त्याचे नाव गुप्टील झाले असे विरुने सांगताच त्याच्यासोबत कॉमेंट्रीला बसलेले आकाश चोप्रा आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या दोघांनाही हसू आवरता येत नव्हते.