आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भारत जागतिक स्पर्धेत पदार्पण करीत आहे. यजमान म्हणून या स्पर्धेत खेळण्याची संधी भारताला मिळाली असली तरी त्यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भारतीय फुटबॉल क्षेत्रातील भविष्यातील तारे या स्पर्धेत खेळणार आहेत. ही स्पर्धा त्यांच्यासाठीही सुवर्णसंधी आहे आणि या व्यासपीठाचा ते कसा उपयोग करतात याची उत्सुकता सर्वानाच आहे.

हेण्ड्री अँटोनाय (बचावपटू)

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक निकोलाई अ‍ॅडम यांनी नाकारलेल्या हेण्ड्री अँटोनायला दुसरी संधी मिळाली आहे. कर्नाटकच्या या बचावपटूने सध्याचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस यांना आपल्या खेळाचे प्रभावित करीत संघात स्थान मिळवले.

लालेंगमाविया (मध्यरक्षक)

लालेंगमाविया हा भारतीय संघात मिझोराम राज्याचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू आहे. १७ ऑक्टोबर २०००मध्ये त्याचा जन्म. इस्ट बंगाल क्लबचा माजी खेळाडू लालिरडिका राल्टे हा त्याचा आवडता खेळाडू, तर बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीला तो आदर्श मानतो. आय-लीग विजेता एजॉल एफसीचा तो कट्टर पाठिराखा आहे. कुंगफू गुरू जॅकी चेन हा त्याचा आवडता अभिनेता असला तरी त्याला ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ हा चित्रपट आवडतो.

नमित देशपांडे (बचावपटू)

अमेरिकेतील नमित देशपांडेची निवडही एआयएफएफच्या खेळाडू शोध मोहिमेतून करण्यात आली. मुंबईत जन्मलेला नमितचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले, परंतु फुटबॉलने त्यांना पुन्हा या देशासोबत जोडले. २००६पासून नमित अमेरिकेत स्थायिक आहे.

अनवर अली (बचावपटू)

आक्रमणपटू म्हणून फुटबॉलमध्ये सुरुवात करणाऱ्या अन्वर अलीने बचावपटू होण्याचा निर्णय घेतला. महिलपूर फुटबॉल अकादमीतून फुटबॉल कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या अन्वरने भारताच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर मिनेव्‍‌र्हा अकादमीने त्याच्यातील फुटबॉल क्षमतेला हेरले. पंजाबमधील जालंधर येथे २८ ऑगस्ट २००० मध्ये अनवरचा जन्म झाला. भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघातील प्रमुख बचावपटू संदेश झिंगन आणि स्पेनचा सेर्गिआ रॅमोस हे त्याचे आवडते खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्लबमध्ये रिअल माद्रिद आणि इंडियन सुपर लीगमध्ये दिल्ली डायनामोज हे त्याचे आवडते क्लब आहेत.

धीरज सिंग (गोलरक्षक)

बॅडमिंटन ते गोलरक्षक असा धीरज सिंगचा प्रवास. अकराव्या वर्षी धीरज फुटबॉल या खेळाशी जोडला गेला. मणिपूरमधील स्थानिक क्लबमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अकादमीत स्थान मिळाले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

सन्नी धलीवाल (गोलरक्षक)

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या खेळाडू शोध मोहिमेतून कॅनडाच्या सन्न धलीवालची निवड करण्यात आली. भारतीय वंशाच्या असलेल्या सन्नीच्या निवडीमुळे गोलरक्षकांसाठी एक उत्तम पर्याय मिळाला आहे.

प्रभसुकन गिल (गोलरक्षक)

गुरप्रित सिंग संधू आणि बफन या गोलरक्षकांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून प्रभसुकन गिल फुटबॉलकडे वळला. पंजाब येथे जन्मलेल्या गिलने भारताच्या १६ वर्षांखालील संघात आपले स्थान निश्चित केले.  त्यानंतर त्याची कुमार विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात निवड झाली.

जॅकसन सिंग (मध्यरक्षक)

मिनेव्‍‌र्हा पंजाब फुटबॉल क्लब अकादमीतील जॅकसन सिंग थोऊनाओजाम मध्यरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. मणिपूर येथील थोऊबाल येथे २१ जून २००१मध्ये त्याचा जन्म झाला. बायचुंग भुतिया या भारताच्या माजी कर्णधाराला तो आदर्श मानतो आणि बेंगळूरु फुटबॉल क्लब हा त्याचा आवडता संघ आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये बार्सिलोनाचा मध्यरक्षक सेर्गिओ बुस्क्यूएट्सचा तो चाहता आहे. मात्र, आवडत्या आंतरराष्ट्रीय क्लबमध्ये जॅकसनचे पारडे बार्सिलोनाचा कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदच्या बाजूने झुकते. रिअल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न त्याने मनाशी बाळगले आहे.

रहीम अली (आघाडीपटू)

पश्चिम बंगालच्या बराकपूर येथे जन्मलेल्या रहीमचे कौशल्य कोका कोला १५ वर्षांखालील (पूर्व विभाग) फुटबॉल स्पर्धेत जाणवले. त्या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याला एआयएफएफच्या अकादमीत संधी मिळाली. कुमार विश्वचषक स्पर्धेत अनिकेत जाधवसह भारताच्या आक्रमणाची जबाबदारी रहिमवर असणार आहे.

अमरजित सिंग (मध्यरक्षक)

कुमार विश्वचषक स्पर्धेत खेळण्यापूर्वीच मणिपूरच्या अमरजित सिंग कियामने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणारा हा पहिला मणिपूरचा खेळाडू ठरणार आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या अमरजितने बायचुंग भुतियाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून फुटबॉल खेळाची निवड केली. अँद्रेस इनिएस्टा याला तो आदर्श मानतो.

अनिकेत जाधव (आघाडीपटू)

भारतीय संघात स्थान पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या अनिकेत जाधवने फुटबॉलसाठी वयाच्या आठव्या वर्षी घरच्यांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. पुण्यात फुटबॉलचे धडे गिरवल्यानंतर कुमार विश्वचषक स्पर्धेसाठीच्या निवड प्रक्रियेत तो सहभाग घेण्यासाठी गेला. अगदी अखेरच्या क्षणाला तो पोहोचल्याने त्याचा सहभाग अनिश्चितेत सापडला, परंतु संघटकांनी त्याला संधी दिली आणि त्याचे सोनं करीत त्याने भारतीय संघात स्थान पटकावले. वडिलांनी रिक्षा चालवून अनिकेतचे स्वप्न पूर्ण केले.

अभिजित सरकार(मध्यरक्षक)

अथक परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्नपूर्ती करता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणून अभिजित सरकारकडे पाहायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या कल्याणी येथे  ५ जानेवारी २००० मध्ये जन्मलेल्या या खेळाडूने युरोपियन दौऱ्यावर अप्रतिम खेळ करीत भारतीय संघातील स्थान निश्चित केले. अभिजितचे वडील रिक्षाचालक आहे, तर आई किराणा मालाच्या दुकानात काम करते. अभिजित मोहन बगानचा चाहता आहे, तर त्याचे वडील इस्ट बंगाल क्लबचे पाठीराखे आहेत. त्यामुळे मोहन बगान आणि इस्ट बंगाल यांच्यातील लढतीदरम्यान घरातील वातावरणही तणावाचे असते. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रिअल माद्रिद क्लबचा तो चाहता आहे.

जितेंद्र सिंग (बचावपटू)

आर्थिक परिस्थितीला झुकवून कोलकाता येथे जन्मलेला जितेंद्र सिंग भारताचा प्रमुख खेळाडू आहे. जितेंद्रचे वडील सुरक्षारक्षक आणि आई शिंपीकाम करून घरखर्च चालवतात. मात्र, परिस्थतीसमोर हार न मानणाऱ्या जितेंद्रने संघातील आपले स्थान अढळ केले आहे. क्रिकेट आणि फुटबॉल यापैकी जितेंद्रने फुटबॉलची निवड केली आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. त्याचे दोन्ही भाऊ फुटबॉलपटू आहेत. जितेंद्रच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राहुल कॅनोली प्रवीण (मध्यरक्षक)

भारतीय दिग्गज फुटबॉलपटू आयएम विजयन यांच्या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या थ्रिसूर येथील राहुल कॅनोली प्रवीण हा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयन यांच्यासह  ख्रिस्तियानो रोनाल्डोला आदर्श मानून राहुलने फुटबॉल खेळायला सुरुवात केली.

नोंगडाम्बा नाओरेम (मध्यरक्षक)

मणिपूरच्या नोंगडाम्बा नाओरेमकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. चिलीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत त्याने केलेल्या खेळाने सर्वाना मोहित केले. अँटोइने ग्रिएझमन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे त्याचे आवडते आंतरराष्ट्रीय, तर जॅकीचंद सिंग हा आवडता भारतीय फुटबॉलपटू आहे. इंडियन सुपर लीगमधील नॉर्थ ईस्ट युनायटेड व प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड या क्लबचे सामने पाहणे तो कधीच चुकवत नाही.

सुरेश सिंग वांगजाम (मध्यरक्षक)

प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवण्याची अचूक क्षमता असलेल्या सुरेश सिंगकडून अधिक अपेक्षा आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचा चित्रपट पाहून सुरेश सिंग प्रेरित झाला. मणिपूर येथील इम्फाल येथे जन्मलेल्या हा १६ वर्षीय खेळाडू टोनी क्रूस आणि मिलन सिंग यांचा चाहता आहे. बॅडमिंटन खेळाची आवड असलेल्या सुरेशला फावल्या वेळेत संगीत ऐकायला आवडते. रिअल माद्रिदचे सर्व सामने तो आवर्जून पाहतो.

कुमानथेम निंथोईगांबा मिटेई (मध्यरक्षक)

भारतीय संघातील उदयोन्मुख मध्यरक्षक म्हणून कुमानथेम मिटेईकडे पाहिले जात आहे. इम्फाल येथे १३ जुलै २००१ सालचा त्याचा जन्म. रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा मोठा चाहता, तर भारतीय संघातील सुनील छेत्रीही त्याला आवडतो. नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि रिअल माद्रिद हे त्याचे आवडते क्लब.

बोरिस सिंग (बचावपटू)

टेनिस चेंडूसोबत बोरिस फुटबॉल खेळायचा. त्याच्या या सवयीमुळे फुटबॉल चेंडूवरील त्याचे नियंत्रण वाखाणण्याजोगे बनले आहे. बोरिसचे आई-वडील किरणा मालाचे दुकान चालवायचे, परंतु काही कारणास्तव दुकान बंद झाले आणि त्यांना रोजंदारीवर काम करणे भाग पडले.

मोहम्मद शाहजहान (मध्यरक्षक)

मोहम्मद शाहजहानला २०१५मध्ये भारतीय संघातून वगळण्यात आले होते, परंतु त्याने प्रचंड मेहनत घेत विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान पटकावले. मणिपूर येथील इम्फाल येथे ३ ऑक्टोबर २०००चा त्याचा जन्म. त्याचे वडील शिंपी असून शाहजहानला फुटबॉलपटू बनवण्यासाठी त्यांनी बरेच प्ररिश्रम केले. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि रिअल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हे त्याचे आवडीचे खेळाडू, तर बेंगळूरु एफसी आणि रिअल माद्रिद हे त्याचे आवडते क्लब आहेत.

संजीव स्टॅलिन (बचावपटू)

अष्टपैलू संजीव स्टेलिन हा भारतीय संघातील प्रमुख बचावपटूंपैकी एक आहे. बेंगळूरुच्या या खेळाडूने आपल्या वडिलांचा आदर्श ठेवून फुटबॉल खेळाची निवड केली. अर्जेटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांना तो आदर्श मानतो. त्याला फुटसाल खेळायलाही आवडते.

कोमल थाटल (मध्यरक्षक)

गोवा येथे गतवर्षी झालेल्या ब्रिक्स १७ वर्षांखालील स्पर्धेत ब्राझीलविरुद्ध गोल करणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान कोमल थाटलने पटकावला. सिक्किमच्या या खेळाडूने २०१४ मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अकादमीत सहभाग घेतला. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोमलची घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडील शिंपी असून आई किराणा मालाच्या दुकानात काम करते.