जर रवी शास्त्री यांना वाटत असेल की, माझ्यामुळे त्यांना भारताचे प्रशिक्षकपद मिळाले नाही, तर मला वाटते की ते मूर्खाच्या जगात वावरत आहेत, असा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीने लगावत वादाला नवे तोंड फोडले आहे.

बीसीसीआयने प्रशिक्षकपदाच्या उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी सल्लागार समितीवर सोपवली होती. या उमेदवारांमध्ये भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांचेही नाव होते. शास्त्री यांच्या मुलाखतीच्यावेळी गांगुली अनुपस्थितीत होते. त्यानंतर शास्त्री यांनी गांगुलीवर जोरदार टीका केली होती. या टीकेवर सुरुवातीला गांगुलीने कोणतेच वक्तव्य केले नसले तरी बुधवारी मात्र त्याने शास्त्री यांच्यावर सडकून टीका केली.

‘‘माझ्या मते शास्त्री हे माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. माझ्यामुळे भारताचे प्रशिक्षक मिळाले नाही, असे जर शास्त्री यांना वाटत असेल तर ते मूर्खाच्या जगात वावरत आहेत,’’ असे गांगुलीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

शास्त्रींनी गांगुलीवर टीका करताना पुढच्या मुलाखतीच्यावेळी उपस्थित राहा, असा खोचक सल्लाही दिला होता. यावर गांगुली म्हणाले की, ‘‘शास्त्री यांच्या सल्ल्याचा मला अतिशय राग आला आहे. मी नेहमीच बीसीसीआयच्या कामासाठी उपस्थित असतो. मी शास्त्रींना असा सल्ला देऊ इच्छितो की, भारताच्या प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी समितीसमोर उमेदवाराने स्वत:हून उपस्थित राहायला हवे. कारण ही फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी जबाबदारीनेच वागायला हवे. बँकॉकला सुट्टय़ांचा आस्वाद लुटताना हे सादरीकरण करू नये.’’